(कराड
अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना फोडून शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद मिळवले. यासोबतच ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यावरून राजकीय वातावरण तापलं असून यावर महाआघाडीतील नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. आता काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
चव्हाण म्हणाले की, मी मनी लाँड्रींग ऐकलं होतं, पण ही मिनिस्टर लाँड्रींग आहे, महाराष्ट्राची जनता अशा प्रकारांना कधीही माफ करणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसवर ७० हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. त्यावेळी त्यांनी शरद पवार व सुप्रिया सुळे यांचे नावही घेतले होते. आता याच राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणि ज्यांच्यावर गंभीर आरोप आहेत. अशा नेत्यांनाच आज मंत्रीपदाची शपथ दिली गेली. हा राजकारणातला मोठा विरोधाभास आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतील हा फुटीर गट नसून ईडी गट आहे, असा हल्लाबोल काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. ते कराडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
राष्ट्रवादी मधील फुटीर ईडी गटातील लोकांनी आपल्याला रात्री चांगली झोप लागावी म्हणून पक्षांतर केले आहे. ‘राष्ट्रवादी’चे एकूण ५३ आमदार आहेत. तरी पक्षांतर बंदी कायद्यानुसार दोन तृतीयांश म्हणजेच ३६ हून अधिक आमदार अजित पवारांसोबत आहेत का हे महत्वाचे आहे. अन्यथा या आमदारांवरही अपात्रतेची टांगती तलवार असेल असे चव्हाण यांनी सांगितले. एकनाथ शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी शिवसेनेतून फुटताना अजित पवारांनी निधी देताना व अन्य गोष्टीत त्रास दिल्याचे म्हटले होते. आता त्याच अजित पवारांच्या हाताखाली त्यांना काम करावे लागणार आहे. आजच्या शपथविधीवेळी शिंदे गटाच्या मंत्री व आमदारांच्या चेहऱ्यावरील भाव बरेच काही सांगत होते असा टोला पृथ्वीराज चव्हाणांनी लगावला.