(चिपळूण)
मुंबई गोवा महामार्गावरील बहादूरशेखनाका येथे सोमवारी दुपारी नव्याने उभारण्यात येणारा उड्डाणपूल कोसळला. या दुर्घटनेच्या निषेधार्थ केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नाव पुलास देण्याच्या मागणीचा फलक पालकमंत्र्यांच्या दौऱ्याच्यानिमित्ताने मनसेने उभारला. पोलिसांनी तो तत्काळ हटवला. त्यानंतर भाजपने याविषयी कारवाईचे निवेदन पोलिसांना दिले आहे. त्यानुसार पोलिसांनी नगर परिषदेला पत्र देऊन या फलकाविषयी माहिती मागत रितसर तक्रार देण्याबाबत सुचवले. त्यावरून चिपळुणात राजकारण पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
काही महिन्यांपूर्वी चिपळूण दौऱ्यावर आलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती तसेच कामात सुधारणा न झाल्यास मनसे गप्प राहणार नसल्याचा इशाराही दिला होता. त्यातच आता बहादूरशेखनाका येथील उड्डाणपूल कोसळल्यानंतर मनसे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. त्यांनी पुलाला गडकरींचे नाव देण्याची मागणी करणारा फलक लावला. यात गडकरींची बदनामी होऊ नये यासाठी पोलिसांनी वादग्रस्त फलक तत्काळ काढला. त्यानंतर येथील भाजप पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत फलक लावणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.
या फलकाची रितसर परवानगी घेतली की विनापरवाना फलक आहे. याबाबतची पोलिसांनी नगर परिषदेला पत्र देऊन माहिती मागवली आहे. शिवाय नगर परिषदेकडून याबाबतची फिर्याद देण्याबाबतही सुचवले आहे. त्यावर नगर परिषदेने अद्याप खुलासा केलेला नाही. नगर परिषदेने रीतसर तक्रार दिल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल, असे पोलिस निरीक्षक रवींद्र शिंदे यांनी सांगितले.