(खेड / भरत निकम)
येथील नगरपरिषदचे माजी नगराध्यक्ष व मनसे पक्षाचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात नगरपरिषद ठराव मुळ दस्तऐवज मध्ये फेरबदल केल्याचा ठपका ठेवून पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. नगरपरिषद कर्मचारी रुपेश एकनाथ डंबे यांनी मुख्याधिकारी यांच्या सुचनेनुसार ही तक्रार दाखल केली होती.
मनसेचे नेते वैभव सदानंद खेडेकर हे डिसेंबर २०१६ ते डिसेंबर २०२१ या कालावधीत थेट जनतेतून खेड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पदावर निवडून गेले होते. या त्यांच्या कार्यकाळात नगरपरिषद ठरावाच्या मुळ मजकूरात बदल करुन महत्वाचे तपशीला व्यतिरिक्त अधिकचा मजकूर नोंद घेवून बनावटीकरण करीत खोटा दस्तावेज तयार केला. सदरचे खोटे दस्तऐवज तयार करुन तो खरा असल्याचे भासवले, हे लक्षात आल्यानंतर मुख्याधिकारी, खेड यांनी कार्यालयीन कर्मचारी रुपेश डंबे यांना खेड पोलिस ठाण्यात तक्रार देण्याचे आदेश दिले. या आदेशानुसार फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर ३२६/२०२३ नुसार भादवि कलम ४६५, ४६५, ४६८ व ४७१ अन्वेय गुन्हा दाखल केला आहे.
यापुर्वीही वैभव खेडेकर यांचेवर नगरपरिषद इंधन खर्चाचा घोटाळा, मागासवर्गीय निधीचा दुरुपयोग केल्याचा ठपका ठेवून गुन्हे दाखल केले आहेत. आता नव्याने ठरावाच्या मुळ मजकुरात फेरबदल केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. ते मनसेचे आक्रमक नेते म्हणून सक्रिय राजकारणात कार्यरत आहेत. अनेक आंदोलनात सहभाग घेतल्यामुळे त्यांचेवर राजकीय गुन्हेही दाखल आहेत. ते समाजकारणातून राजकारण करणारी व्यक्ती अशी त्यांची जनमानसात ओळख आहे. मनसे पक्षात ते सरचिटणीस पदावर कार्यरत असून गेल्या काही वर्षांत त्यांचे बरेचसे सवंगडी सोडून अन्य पक्षात गेले. तरीही ते राजकीय पटलावर टिकून आहेत. त्यांनी वकीलीची पदवी प्राप्त केलेली आहे. मनमिळावू व सतत जनसेवा अंगी असणारी व्यक्ती म्हणून ते जनमानसात ओळख निर्माण करुन आहेत.