रत्नागिरी : राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (मनरेगा) माध्यमातून चिंचखरी हे कोकणातील पर्यटन मॉडेल गाव बनविण्यासाठी प्रयत्न करण्यास जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. या माध्यमातून गावात खारलॅण्ड बंधारे बांधणे, शेततळी उभारणे, मत्स्य पालनाला चालना देणे, शेळी पालनासह कुक्कुटपालन योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती आमदार प्रसाद लाड यांनी दिली.
आमदार लाड यांनी चिंचखरी गावातील सामुहिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी पुढाकार घेतला. हा विषय सातत्याने जिल्हा प्रशासनापुढे मांडला होता. गेल्या सहा महिन्यात जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाकडून चिंचखरी गावात केलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष मुन्ना चवंडे, सचिन करमरकर, नगरसेवक व तालुकासरचिटणिस उमेश कुळकर्णी, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन यांच्यासह चिंचखरीतील ग्रामस्थ आणि कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत आमदार लाड यांनी ग्रामस्थांच्या मागण्या जिल्हाधिकार्यांपुढे मांडल्या. जुलै महिन्यात झालेल्या अतिमुसळधार पावसात खाडीचे पाणी भातशेतीत शिरले होते. या ठिकाणी खारलॅण्ड बंधारा बांधणे आवश्यक आहे. ग्रामस्थांनीही समस्या मांडल्या. यावर जिल्हाधिकारी यांनी मनरेगा योजनेतून विविध कामे हाती घेता येऊ शकतात असे सांगितले.
कोकणातून 33 टक्केच निधी खर्ची पडत असल्याने विकासकामांचे नियोजन करणे आवश्यक आहे. त्यासाठी चिंचखरी हे गाव मनरेगातील मॉडेल गाव बनविता येऊ शकेल. त्यासाठी येत्या पंधरा दिवसांमध्ये ग्रामस्थांनी आराखडा बनविण्याची तयारी करावी. जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मनरेगाच्या अधिकार्यांसह चिंचखरी येथे ग्रामस्थांना मार्गदर्शनासाठी बैठक आयोजित करण्यात येईल. त्यामध्ये गटशेतीला चालना देण्यासाठी खारलॅण्ड बंधारा बांधणे, शेळीपालन, शेततळी, मत्स्य पालनासाठी आवश्यक पाँड, गोपालन शेड याची माहिती दिली जाईल. मनरेगांतर्गत जॉबकार्ड काढण्याची ग्रामस्थांनी तयारी करावी. विकासकामांचा आराखडा बनविण्याचे काम प्रशासन करुन घेऊन असे आश्वासन जिल्हा प्रशासनातर्फे दिले. त्यासाठी ग्रामस्थांनी पुढे यावे असे आमदार लाड यांनी सांगितले.
आरोग्य विभागाला साहित्य आवश्यक होते. त्यांच्या मागणीनुसार आमदार निधीतून 84 लाख रुपयांची पोर्टेबल एक्सरे मशिन, मॉनिटेरिंग मशिन, टेबल टॉप यासारखी यंत्रसामग्री गुरुवारी (ता. 16) जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहेत, असे आमदार लाड यांनी सांगितले.