(भोपाळ)
मध्यप्रदेशातील भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांपैकी नव्या मुख्यमंत्र्यांची निवड करण्यासाठी बैठक झाली. त्यामध्ये मुख्यमंत्री म्हणून मोहन यादव यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्याशिवाय, इतर नेत्यांची जबाबदारीही निश्चित करण्यात आली. मध्यप्रदेशातील भाजपच्या नव्या सरकारमध्ये दोन उपमुख्यमंत्री असतील. त्याशिवाय, ज्येष्ठ नेते नरेंद्रसिंह तोमर यांचे विधानसभेच्या सभापतिपदाचे उमेदवार म्हणून नाव निश्चित झाले आहे.
राजेंद्र शुक्ला आणि जगदीश देवडा हे नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असतील. तर, माजी केंद्रीय मंत्री तोमर सभापती म्हणून नव्या भूमिकेत दिसतील. त्याविषयीची माहिती मावळते मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी बैठकीनंतर सोशल मीडियावरील पोस्टच्या माध्यमातून दिली. विधानसभा निवडणुकीआधी तोमर हे केंद्रीय कृषिमंत्री होते.
भाजपने ज्या खासदारांना विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले, त्यामध्ये तोमर यांच्याही नावाचा समावेश होता. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत त्यांचेही नाव आले. आमदार बनल्याने त्यांनी खासदारकीबरोबरच केंद्रीय मंत्रिपदाचाही राजीनामा दिला. मात्र, मुख्यमंत्रिपदाने त्यांना हुलकावणी दिली. तसे असले तरी सभापतिपद देऊन पक्षाने त्यांच्या अनुभवाला योग्य न्याय दिल्याचे मानले जात आहे.
मध्यप्रदेशातील राजकारणावर प्रदीर्घ काळ पकड ठेवणारे भाजपचे ज्येष्ठ नेते शिवराजसिंह चौहान यांनी सोमवारी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. नवे मुख्यमंत्री निश्चित झाल्यानंतर शिवराज यांनी ते पाऊल उचलले. त्यांनी शनिवारीच सोशल मीडियावर रामराम अशी पोस्ट टाकून स्वत:चे राज संपत असल्याचे जणू संकेतच दिले होते. पाचव्यांदा मुख्यमंत्री बनण्याची शिवराज यांची संधी हुकली. त्यांच्या नावावर सर्वांधिक काळ मुख्यमंत्रिपद भुषवणारा भाजप नेता हा विक्रम जमा आहे. शिवराज हे ६४ वर्षे वयाचे आहेत. त्यामुळे ते अजून बराच काळ राजकीय पटलावर सक्रीय राहू शकतात. त्यांना केंद्रात जबाबदारी दिली जाऊ शकते, अशा चर्चा सुरू आता झाल्या आहेत.