(लखनौ)
पुढची निवडणूक लढवायची असेल तर ती मथुरा येथून लढवेन. इतर कोणत्याही जागेवर लढा देण्याचा प्रस्ताव स्वीकारणार नसल्याचे अभिनेत्री आणि मथुरा लोकसभा मतदारसंघातील भाजपा खासदार हेमा मालिनी यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारच्या ९ वर्षांच्या कारकिर्दीच्या कामगिरीबद्दल पत्रकारांशी झालेल्या संभाषणादरम्यान एका प्रश्नाला उत्तर देताना हेमा मालिनी यांनी आपले मत व्यक्त केले.
हेमा मालिनी यांनी २०१४ आणि २०१९ अशा दोन्ही लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. त्यात त्या विजयी झाल्या होत्या, आता तिसऱ्यांदा लोकसभा निवडणूक लढवणार का? असा प्र्श्न त्यांना विचारण्यात आला. यावेळी या प्रश्नावर उत्तर देताना हेमा मालिनी यांनी म्हटे की, जर मला पक्षाने निवडणूक लढवण्यासाठी तिकीट दिले तर मी नक्कीच निवडणूक लढवेन. पण मथुरेव्यतिरिक्त अन्य कुठूनही तिकीट दिल्यास हा प्रस्ताव स्वीकारणार नसल्याचे त्यांनी म्हटले. याचे कारण देताना त्या म्हणाल्या, भगवान कृष्ण यांच्याविषयी मनात नितांत श्रद्धा आहे. श्रीकृष्णाच्या भक्तांविषयीही मनात प्रचंड प्रेम आणि आपुलकी असल्याने त्यांची सेवा करण्याची इच्छा असल्याने हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मागील नऊ वर्षात मोदी सरकारने जे काम केले आहे त्यामुळे ते तिसऱ्यांदाही पंतप्रधान होतील,असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.