(रत्नागिरी / प्रतिनिधी)
मतदार जागृती, मतदान कार्डासाठी नोंदणी करणे आणि मतदान कार्ड व आधार कार्ड जोडण्याच्या प्रचार, प्रसिद्धीसाठी बुधवारी सकाळी रत्नागिरी शहरातून सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी, जिल्हा प्रशासन, उपविभागीय व तहसीलदार कार्यालय आणि रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने याचे नियोजन केले होते. सायकलपटूंनी या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
ही फेरी सुमारे शहराच्या मुख्य रस्त्यांवरून सुमारे दहा किलोमीटर मार्गावर फिरविण्यात आली. सकाळी ७.१५ वाजता मारुती मंदिर सर्कल येथून फेरीला सुरुवात झाली. मारुती मंदिर सर्कल, माळ नाका, जयस्तंभ, एसटी स्टँड, राम आळी, गोखले नाका, काँग्रेस भवन, आठवडा बाजारमार्गे जिल्हाधिकारी कार्यालय आवार १०० फुटी झेंडा इथे या सायकल फेरीची सांगता झाली.
निवासी उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीकांत गायकवाड, प्रांताधिकारी विकास सूर्यवंशी, तहसीलदार शशिकांत जाधव, नायब तहसीलदार माधवी कांबळे, रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे योगेश मोरे, दर्शन जाधव, महेश सावंत, विनायक पावसकर, उमेश गोठिवरेकर, योगेश सामंत, मुग्धा सामंत, डॉ. नितीन सनगर, यतिन धुरत, मंगेश शिंदे, समीर धातकर, संदीप पावसकर, राजीव लिमये, मकरंद पटवर्धन, मंदार वायंगणकर, रत्नागिरी सायकलिस्ट ज्युनिअर क्लबचे अर्णव पटवर्धन, अर्णव जोगळेकर, वेद ठाकूर, नीलेश लिमये, मित भुवड आदींसमवेत शासकीय अधिकारी, कर्मचारी यात सहभागी झाले होते.