(नवी दिल्ली)
मतदार यादी आधार क्रमांकाशी जोडली जात असतानाच मतदारांचा आधार डेटा लिक झाल्यास संबंधित नोंदणी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा निवडणूक आयोगाने मंगळवारी दिला आहे. दोनपैकी एक नाव रद्द करण्यासाठी मतदार यादीला आधारशी सलग्नित करण्यास परवानगी देणारा नियम नुकताच जारी करण्यात आला आहे. अशातच आयोगाने अधिकाऱ्यांना सज्जड दम भरला आहे. मतदार यादीशी आधार क्रमांक जोडणे, ऐच्छिक असल्याचेही आयोगाने स्पष्ट केले.
केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्वच राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना नुकतेच एक पत्र पाठवले आहे. यात म्हंटले आहे की, मतदार यादी परिक्षणासाठी विशेष शिबिरे आयोजित करता येऊ शकतात. या ठिकाणी हार्ड कॉपीतील फॉर्म क्रमांक-६ मध्ये मतदार स्वेच्छेने आधार क्रमांक नोंदवू शकतो. आधार क्रमांक मागण्यामागे मतदाराचे नाव व इतर तपशिलाचे प्रमाणीकरण करण्याचा हेतू आहे.
तसेच यामुळे भविष्यात मतदारांना चांगल्या सुविधा प्रदान करण्यासाठीही मदत होऊ शकते. याबाबत नोंदणी अधिकाऱ्यांनी मतदारांपुढे स्थिती स्पष्ट करावी, असे निवडणूक आयोगाने आपल्या पत्रात ठळकपणे नमूद केले आहे. मतदारांचा आधार क्रमांक जतन करण्यासाठी सुरक्षात्मक नियमांचे पालन करावे. कोणत्याही स्थितीत सार्वजनिक ठिकाणी आधार डेटा उघड करू नये. यदाकदा आधारचा डेटा लिक झाल्यास मतदार नोंदणी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे निवडणूक आयोगाने बजावले आहे.