(मुंबई / निलेश कोकमकर)
मणिपूर राज्यात गेल्या काही महिन्यांपासून आदिवासी आणि बिगर आदिवासींमध्ये झालेल्या संघर्षात अन्य महिलांमधील दोन महिलांचा व्हिडिओ समोर आल्यानंतर देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. महाराष्ट्रातही या घटनेच्याविरोधात आणि महिलांना न्याय मिळावा म्हणून आंदोलनं करण्यात येत आहे. त्याच मुंबईत दादर येथे देखील मणिपूर राज्यातील महिलावरील अत्याचार विरोधात मुसळधार पाऊस असूनहि कुणबी महिला मंडळ, कुणबी युवा, बळीराज सेना यांच्यामार्फत आक्रोश आंदोलन करण्यात आले.
मणिपूर येथील घटना लज्जास्पद आहे, देशाची मान शरमेने खाली घालणारी आहे. पुरुषी अत्याचाराचा हा उन्माद होता, तेथील मुख्यमंत्री एन. बिरेंद्र सिंग यांना घडलेली दंगल, महिला अत्याचार बाबत काहीच वाटत नाही का?, केवढे हे निगरगट्ट लोक असावेत. देशाची 56 इंच छाती फुस्स झालीय, राष्ट्रपती गप्प आहेत, संसदेत विरोधकांना बोलायला देत नाहीत, सर्वत्र हुकूमशाही सुरू आहे. कुणी काहीही बोलत नाही, कुणाला काहीही पडलेलं नाही. याचा संताप आज सामान्य माणूस रस्त्यावर उतरून करीत आहे. महिला मग ती कोणत्याही जाती – धर्माची असो तिचा आदर सन्मान करणे ही छत्रपती शिवरायांची व शंभूरायांची शिकवण आहे. बेटी बचाव, बेटी पढाव हा नारा नावाला आहे. प्रत्यक्षात बेटी अत्याचाराने पिडीत आहे ह्याकडे कुणीच लक्ष देत नाहीय. देशात महिला, बेटी सुरक्षित नाहीत, रोज कुठे कुठे महिलांवर अत्याचार घडत आहेत. मणिपूर मध्ये नराधमांनी महिलांना नग्न करून त्याची धिंड काढून अत्याचार केले अशाने देशातील माणुसकीला काळिमा फसला आहे. देशात मनुस्मृती लागू झालीय की काय असे वातावरण घटना सर्वत्र सुरू आहेत. केंद्र सरकार, विरोधी पक्ष नेते, महिला पुढारी, त्यांचे लोक गप्प आहेत. महिलांच्या बाबतीत ते एक शब्द बोलत नाहीत, अशा प्रकारे मनातील चीड, राग भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
केंद्र सरकार काहीच ठोस कारवाई करित नाही. म्हणून आता ही लढाई प्रत्येक आईची, बहिणीची व त्या आईच्या लेकराची व बहिणीच्या भावाची आहे, असे मत कुणबी युवा मंडळचे अध्यक्ष माधव कांबळे यांनी व्यक्त केले. आता सरकार जर न्याय करीत नसेल तर या लोकांना घालवू देण्याची वेळ आलीय. मणिपूर राज्यातील घटनेच्या आक्रोशाची ठिणगी आता सर्वत्र पसरली असून महिला वर्गात प्रचंड संताप आहे. या घटनेचा निषेध म्हणून बुधवार 26 जुलै 2023 रोजी संध्याकाळी ठीक 6 वाजता, दादर रेल्वे स्टेशन पूर्व येथे कुणबी महिला मंडळाच्या वतीने अध्यक्षा सुवर्णा सुनिल पाटील, सेक्रेटरी दिपीका आंग्रे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
यावेळी अनेक संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. कुणबी समाजोन्नती संघ मुंबई अंतर्गत कुणबी महिला मंडळ, कुणबी युवा मंडळ, कुणबी राजकिय संघटन समिती, विवाह सल्लागार मंडळ, सोबतच बळीराज सेना, भारतीय लोकसत्ताक संघटना, ओबीसी संघर्ष समिती यांचे प्रतिनिधी सामील होते.