( रत्नागिरी )
कोकण किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात सापडणारा तारली मासा. वातावरणातील बदल, चक्रीवादळ, तुटलेली अन्नसाखळी आणि मोठ्या प्रमाणात होणाऱ्या मासेमारीमुळे तो स्थलांतरित झाला होता. पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा या प्रजातीचे मासे मिळू लागले आहेत. महिनाभरापासून कोकण किनारपट्टीवर मच्छीमारांच्या जाळ्यात मोठ्या प्रमाणात ‘तारली’ सापडू लागली.
वाढत्या उष्म्याचा समुद्री जिवांवर अजून तेवढा परिणाम झालेला नसल्याचे मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. एक जमेची बाजू म्हणजे २०१७ पासून कोकण किनारपट्टीवरून स्थलांतरित झालेला तारली मासा पाच वर्षांच्या प्रवासानंतर पुन्हा या भागात आला आहे. त्यामुळे मच्छीमारांना दर्जेदार मासळी सापडली नाही, तरी ‘तारलीने तारले’ असे म्हणता येणार आहे. सध्या या व्यवसायावर मोठा परिणाम झाला.
औषधी गुणधर्मयुक्त
तारली मासा खाण्यासाठी वापरतात. त्याचवेळी या माशापासून चांगल्या दर्जाचे तेल मिळते. ‘ओमेगा-३’ हा घटक असणारे हे तेल औषधी आहेच. या तेलापासून साबण, रंगही तयार करतात. या तेलाचा मार्गारीन, पेंट्स, वॉर्निश आणि लिनोलियम तयार करण्यातही वापर होतो. तेल वेगळे केल्यावर उरलेल्या भुकटीचा वापर पशु-पक्ष्यांच्या खाद्यात पूरक घटक म्हणून करतात. ही भुकटी काही कारणाने खराब झाली, तर तिचा खत म्हणूनही उपयोग केला जातो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून या माशाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे.