(रत्नागिरी)
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून (मग्रारोहयो) मागेल त्याला पाहिजे, ते काम या संकल्पनेवर अधारित दशवार्षिक आराखडा बनविण्यात आला आहे. या योजनेत कोकणातील 50 गावांची प्रायोगीक तत्त्वावर निवड करण्यात आली आहे. निवडलेल्या गावातील आराखडे तयार करून या गावात किमान पाच कामे सुरू करण्याच्या सूचना प्रशासनाने केल्या आहेत.
‘मग्रारोहयो’त ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाच्या गरजेप्रमाणे उपलब्ध संसाधनांचा विचार करुन वैयक्तिक लाभाच्या कामांची जोड देत शाश्वत उत्पन्नाचा स्रोत निर्माण करण्यासाठी मागेल त्याला पाहिजे ते काम ही संकल्पना राबविण्यात आली आहे.
सार्वजनिक स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, जल व मृद संधारण व पायाभूत सुविधांच्या विकासाशी निगडित कामांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. या योजनेत जिल्ह्यातील निवडलेल्या प्रत्येक गावात जाऊन ‘मग्रारोहयो’ची टीम स्थानिक ग्रामपंचायत पदाधिकार्यांसह तेथील रोजगार सेवकांच्या मदतीने घरोघरी सर्वेक्षण करणार आहे. यामध्ये गावातील लोकांच्या गरजा काय आहेत, गावात कोणते प्रकल्प राबवता येऊ शकतात, याची तपासणी या टिमतर्फे करण्यात येणार आहे. या गावांचा दहा वर्षाचा आराखडा तयार करण्यात आला असून प्रत्येक गावांत मग्रारोहयोत पाच कामांची पूर्वतयारी सुरू करण्यात आली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात या योजनेत दहा गावांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये चिपळूण तालुक्यातील गांग्रई, दापोलीतील गावतळे, गुहागरातील रानवी, खेड तालुक्यातील भिलई आयनी, लांजा तालुक्यातील तळवडे , मंडणगडातील पालघर, राजापुरातील जुवाठी, रत्नागिरीतील लाजूळ, वळके तर संगमेश्वर तालुक्यातील सांगवे या गावांचा समावेश आहे.