(रत्नागिरी)
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी जिल्ह्यात बेरोजगारांना रोजगाराच्या संधी प्राप्त व्हाव्यात आणि तरुण उद्योजक बनावेत यासाठी तरुण, तरुणींनी स्वत:चा व्यवसाय करुन आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे या हेतून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेची अंमलबजावणी केली. मात्र मंत्री उदय सामंत यांनी बँकांना तरुणांची कर्ज प्रकरणे मंजूर करावीत, कोणतीही कटकट करू नये अशी तंबी दिली होती. मात्र तरीही बँका एक ना अनेक कारणे देत कर्ज नाकारत आहेत. यामुळे आता तरुण वर्ग नाराज होत आहे. एका बाजूला तुम्ही उद्योजक व्हा अस सांगितल जात आणि दुसऱ्या बाजूने बँका कर्ज नाकारून तरुणांना निराशेच्या गर्तेत टाकत आहेत. मंत्री उदय सामंत यांच्या आदेशाला ही बँकांचे अधिकारी जुमानत नसल्याचे अनेक तरुण सांगत आहेत.
मुख्यमंत्री रोजगार योजनेमुळे 2 हजार 229 लोकांनी जिल्हा उद्योग केंद्रामार्फत अर्ज भरुन बँकेकडे कर्जासाठी सादर केले. मात्र, हजारों प्रकरणातून केवळ 272 प्रकरणे मार्गी लागली. प्रशासनाकडून अंमलबजावणी ठोसपणे होत असताना बँका मात्र कर्ज देताना अनेक त्रुटी दाखवून या योजनेचे अर्ज नामंजूर केले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही रोजगार निर्मिती योजना रत्नागिरी जिल्ह्यात लागू करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली होती. या योजनेची अंमलबजावणी काटेकोरपणे झाले पाहिजे, यासाठी मंत्री सामंत यांनी वारंवार पाठपुरावाही केला मात्र त्यानंतर जिल्हा उद्योग केंद्राकडून 2 हजार 229 अर्ज बँकांकडे सादर झाल्याची माहिती समोर आली. यातील 1452 प्रकरणे नामंजूर करुन केवळ 272 प्रकरणांना बँकांनी कर्ज मंजूर केले आहे. धक्कादायक म्हणजे इतर काही जिल्ह्यामध्ये बँकांकडून लाभार्थींना चांगला प्रतिसाद दिला जात असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र रत्नागिरी जिल्ह्यातच काही बँकांकडून या योजनाा यशस्वी करण्यासाठी प्रतिसाद मिळत नाही. कागदपत्रे अपूर्ण, योजनेत बसत नाही अशी नानाविध कारणे पुढे करत प्रकरणे नामंजूर केली जात आहेत, असे उमेदवारांचे म्हणणे आहे.