(मुंबई)
गुरुवारी दुपारी मंत्रालय बॉम्बनं उडवून देण्याची धमकी दिल्याच्या फोननंतर आता धारदार चाकू घेऊन मंत्रालयात प्रवेश करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ही व्यक्ती मराठवाड्यातील रहिवासी असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, मुंबईतील मंत्रालयाच्या नव्या इमारतीत धारदार चाकू घेऊन जाण्याचा प्रयत्न एक व्यक्ती करत होता. हा व्यक्ती उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा इथला असल्याची माहिती मिळते आहे.
मंत्रालयाच्या आवारात सुरक्षा रक्षकांनी त्याची बॅग स्कॅन केली त्यात त्याच्या बॅगेत काहीतरी धातूची वस्तू असल्याचं डिटेक्ट झालं. त्यानंतर या व्यक्तीची बॅगची प्रत्यक्ष तपासणी केल्यानंतर यात एक धारदार चाकू आढळून आला. दरम्यान, हा चाकू बँगेत घेऊन संबंधित व्यक्ती मंत्रालयात जात असल्यानं एकच खळबळ उडाली. त्यानंतर पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेतलं, यामागचं कारण शोधण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासन करत आहे.