(मुंबई)
एकीकडे सामान्यांसाठी मंत्रालय प्रवेशाकरता निर्बंध आणले जात आहेत. तर दुसरीकडे दलालांचा मात्र मंत्रालयात मुक्त संचार आहे, असा थेट आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. मंत्रालयाजवळच्या निर्मल बिल्डिंगमध्ये या सरकारचा सर्वांत मोठा दलाल बसतो. या दलालाचे रेकॉर्डिंग काँग्रेसकडे असल्याचा आरोप त्यांनी केला. येत्या अधिवेशनात भाजपच्या पेनड्राईव्हपेक्षा मोठा बॉम्ब फोडणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. नाना पटोले यांचा इशारा भाजपच्या कोणत्या नेत्याकडे आहे याची राजकीय चर्चा आता सुरू आहे.
राज्यातल्या कामांचे कंत्राट कुणाला द्यायचे हे मंत्रालयाजवळच्या निर्मल बिल्डिंगमध्ये ठरत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला. ते म्हणाले की, राज्यातल्या मोठ्या कंत्राटांच्या मोठ्या रकमा याच निर्मल इमारतीतून ठरतात. कंत्राट कोणाला द्यायचे हे ही निर्मल इमारतीतल्या याच दलालाकडून ठरवले जाते. एवढेच नव्हे, तर कंत्राट कोणाला द्यायचे यापासून ते मोठ्या कंत्राटाच्या मोठ्या रकमा देण्यापर्यंत सर्व गोष्टी याच इमारतीतून ठरतात. निर्मल बिल्डिंगमधल्या या दलालाचा पर्दाफाश येणा-या अधिवेशनात काँग्रेस करणार आहे.
दोन उपमुख्यमंत्र्यांत मुख्यमंत्रिपदासाठी शर्यत
राज्यात महायुतीचे सरकार जनहिताची कामे करीत असल्याचा दावा करीत आहे. परंतु सत्ताधारी तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये समन्वय नसल्याचे सातत्याने दिसून येत आहे. विशेष म्हणजे राज्यातील दोन उपमुख्यमंत्र्यांमध्ये आधी कोण मुख्यमंत्रिपदापर्यंत पोहोचणार, यासाठी शर्यत सुरू आहे. या शर्यतीत जनहिताच्या कामाचा सर्वांना विसर पडला आहे, असा आरोप पटोले यांनी केला
नाना पटोलेंनी केलेले आरोप आणि त्यांचा इशारा कुणाकडे आहे याची राजकीय चर्चा आता चांगलीच रंगल्याचे दिसून येत आहे. तसेच नाना पटोले यांच्याकडे नेमके काय रेकॉर्डिंग आहेत आणि नेमके काय पुरावे असण्याची शक्यता आहे याबद्दलही चर्चा सुरू आहे. कुणीतरी ट्वीट केले नंतर ते डिलीट केले, यावरून भाजप आणि इतर दोन पक्षांमध्ये किती सुसंवाद आहे हे दिसतच आहे असा टोला नाना पटोले यांनी लगावला आहे.
राज्यात डॉल्बीमुळे झालेल्या मृत्यूवर बोलताना नाना पटोले म्हणाले की, राज्यात कोणत्याही नियमांचे पालन होत नाही. कायद्याचे राज्य उरलेले नाही. गणपती बाप्पा या सरकारला बुद्धी देवो. त्यांना बुद्धी नाही आली तर हे सरकार लवकर जाऊ दे.