(मंडणगड)
संविधान निर्मात्यांच्या गावी आल्याचा सार्थ अभिमान वाटत असून, लवकरात लवकर मंडणगड तालुक्यामध्ये कोर्ट चालू करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सूतोवाच बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे अध्यक्ष अँड. मिलिंद पाटील यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर बॅरिस्टर होऊन भारतात आल्याच्या घटनेच्या निमित्ताने सोमवारी (ता. ३) स्मृती जागवणाऱ्या सोहळ्याचे आंबडवे येथे आयोजन केले होते. हा अभिवादन सोहळा म्हणून गणला जाणार आहे.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर लंडनच्या ग्रेज इनमधून बॅरिस्टर झाले. ३ एप्रिल १९२३ ला भारतात आले. या ऐतिहासिक घटनेला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. कायद्याचे राज्य आणि न्यायालयाचे स्वातंत्र्य या संकल्पना दृढमूल होण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. ज्या बॅ. बाबासाहेबांनी न्यायव्यवस्थेला दिशा दिली व भारतीय राज्यघटनेची निर्मिती करून नागरिकांना मूलभूत स्वातंत्र्य दिले त्या बाबासाहेबांनी बॅरिस्टर होऊन भारतात येणे या इतिहासाला कलाटणी देणाऱ्या अपूर्व घटनचे स्मरण ठेवून त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. अभिवादन सोहळा सोमवारी दुपारी ४ वा. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह, आंबडवे येथे आयोजित केला होता.
या कार्यक्रमास अॅड. मिलिंद पाटील, अध्यक्ष अॅड. संग्राम देसाई, उपाध्यक्ष (बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा), स्वागताध्यक्ष अॅड. विलास पाटणे उपस्थित होते. या वेळी स्वागताध्यक्ष अॅड. विलास पाटणे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविकात बाबासाहेबांनी सुरू केलेली सामाजिक चळवळ अधिक संघटित करण्याचे आवाहन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वकिल कार्कीर्दीतील आठवणींना उजाळा दिला.बाबासाहेबांनी न्यायालयाचे स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य,हिंदू कोड बिल यासाठी संघर्ष केला असे सांगितले.
अॅड. संग्राम देसाई यांनी डॉ. आंबेडकर यांच्या कार्याचा आढावा घेत असाच कार्यक्रम पुढील काळातसुद्धा आयोजित करण्याचा मनोदय व्यक्त केला. सिद्धयोग विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रीती बोंद्रे यांनीही विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार मंडणगडचे अध्यक्ष अॅड. मिलिंद लोखंडे यांनी मानले. यावेळी दापोली , मंडणगड ,चिपळूण ,महाड परिसरातील बहुसंख्य वकील हजर होते.