( मंडणगड / प्रतिनिधी )
मंडणगड तालुक्यात किंजळघर येथे घराजवळ मोठी दरड कोसळली. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही. पण खबरदारीचा उपाय म्हणून किंजळघर येथील तीन कुटूंबातील १६ नागरिकांचे तात्काळ स्थलांतर करण्यात आले आहे. दरम्यान या घटनेचे गांभीर्य ओळखून येथील सर्वेक्षण करण्यासाठी भू वैज्ञानिकांना तहसीलदार दत्तात्रेय बर्डे यांनी पाचारण केले आहे.
शुक्रवारी ८ जुलै रोजी ही घटना समजताच मंडणगड तहसीलदार दत्तात्रय बेर्डे, गटविकास अधिकारी सुवर्णा बागल, जिल्हा परिषद बांधकाम विभाग अभियंता सकपाळे व महसूल कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन परिसराची पाहणी केली .
तस्लिम अयुब ओंबिलकर यांच्या कुटुंबातील ६ सदस्य, हसमत महमद शेख यांच्या कुटुंबातील ३, तन्वीर अयुब ओंबीलकर यांच्या कुटुंबातील ७ अशा एकूण १६ नागरीकांना सहकार्य करत यांची व्यवस्था एका शाळेत करण्यात आली होती.पण, ही सगळी तीनही कुटूंब नातेवाईक जवळच असल्याने तात्पुरते नातेवाईकांकडे शिफ्ट झाली आहेत. त्यांना सध्या पावसाळ्याच्या दिवसात तात्पुरत्या स्वरुपात स्थलांतर करणेसाठी सुचना तसेच नोटीसा देण्यात आल्या आहेत.