(मंडणगड / प्रतिनिधी)
तालुक्यातील दुधेरे येथे रविवारी मध्यरात्री झालेल्या दुचाकी अपघातात चिपळूण-पिंपळी येथील 17 वर्षीय विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. तर खेड-भडगाव येथील दुचाकी चालवणारा दुसरा युवक गंभीर जखमी झाल्याने मुंबई येथे हलवण्यात आले. या अपघातात मृत झालेल्या विद्यार्थाचे नाव पार्थ विजय इंदुलकर असून दुचाकीस्वार सिध्दांत अरविंद माने (18) असे गंभीर जखमी युवकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दुधेरे पुलानजिक रविवार मध्यरात्रीनंतर व सोमवारी पहाटे मंडणगडकडे येणाऱ्या दुचाकीस अवघड वळणावर अपघात झाला. स्थानिकांना सकाळी गाडीचा चालक बेशुद्द अवस्थेत दिसून आला. त्यांनी याबाबतची माहिती मंडणगड पोलिसांना दिल्यानंतर पोलीस तत्काळ घटनास्थळी हजर झाले.
या अपघातात दुचाकीवरुन प्रवास करणारा पार्थ याचा जागेवरच मृत्यू झाला होता. मोटारसायकल चालक माने मात्र गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला. त्याला 108 रुग्णवाहिकेच्या मदतीने तातडीने ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करून अधिकच्या उपचाराकरिता त्याला मुंबई येथे पाठवण्यात आले. याबाबतचा अधिक तपास पोलीस करत आहेत.