(मंडणगड)
तालुक्यातील भिंगळाेली येथील एका प्राैढाने ट्रॅक्टरवर लपून ठेवलेल्या जिलेटीनच्या १५४ कांड्या सापडल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मंडणगड पाेलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला असून, ४ लाख ०२ हजार ७८१ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. रतनलाल बाळू रामजी तेली (४३, रा. समर्थनगर भिंगळाेली, मंडणगड, मूळ रा. पहुना, चित्ताेडगड, राजस्थान) असे गुन्हा दाखल केलेल्या प्राैढाचे नाव आहे. ही कारवाई गुरुवारी सकाळी ७:४५ वाजता करण्यात आली.
भिंगळाेली येथील रतनलाल तेली याच्या ट्रॅक्टरवर १५४ जिलेटीनच्या कांड्या ठेवलेल्या हाेत्या. या कांड्या पांढऱ्या प्लास्टिक आच्छादनामध्ये गुंडाळून ठेवलेल्या हाेत्या. त्यावर इंग्रजीमध्ये डेंजरस एक्सप्लाेझिव्ह, टायगर सुपर पाॅवर ९० जाेगनिया एक्सप्ललाेझिव्ह प्रा. लि. गाव हदियाखेरी अॅण्ड कंपनी, जि. भिलवारा, राजस्थान असे लिहिलेले हाेते. तसेच १५ डेटाेनेर सापडले असून, सर्वांच्या एका ताेंडाला इलेक्ट्रीक वायर जाेडलेल्या हाेत्या. येथे ९ नाेडल कॅपचा सेट, लाल रंगाची १९८ रुपयांची ९ मीटर लांब काेरटेक्स वायरही सापडली आहे. हे सर्व साहित्य ठेवलेला ट्रॅक्टर (आरजे ०९, आरबी १०२३) ही जप्त करण्यात आला आहे.
मंडणगड पाेलिसांनी रतनलाल बाळू रामजी तेली याच्याविराेधात भारतीय दंड विधान कायदा कलम २८६ व स्फाेटक पदार्थ अधिनियम १९०८ चे कलम ४,५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.