(मंडणगड / प्रतिनिधी )
रत्नागिरी जिल्ह्यात एक अतिशय घृणास्पद घटना घडली. मंडणगड तालुक्यातील म्हाप्रळ येथे एका 6 महिन्याच्या गर्भवती महिलेला 5-6 जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना 1 ऑगस्ट रोजी घडली. या मारहाणीनंतर महिलेच्या पोटातील सहा महिन्याच बाळ दगावल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. महिलेने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसानी 6 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. फुरकान मुकादम, त्याची आई (नाव माहित नाही), जहुर मुकादम, हसमत काझी, फैजान मुकादम, अब्बास मुकादम अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सहा जणांची नावे आहेत. त्यांच्यावर भादवीकलम 141, 143, 149, 315, 316, 504, 506, 354 (ड) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद मरियम डावरे (34, म्हाप्रल) यांनी पोलिस स्थानकात तक्रार दिली. याबाबतचा अधिक तपास शैलजा सावंत करत आहेत.
सविस्तर वृत्त असे की, वरील 6 जणांनी मरियम यांना 23 जुलै रोजी पूर्वीचा राग मनात धरून मारहाण केली होती. त्या 6 महिन्याच्या गर्भवती असताना त्यांच्या पोटावर लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. एवढच नव्हे तर मारहाण करताना पीडित महिलेच्या पोटावर फरहान मुकादम उभा राहिला होता असा गंभीर आरोप महिलेने केला आहे. प्रसूती दरम्यान या महीलेने एक व्हिडिओ केला. या व्हिडिओ मध्ये तिने ही माहिती दिली आहे.
या मारहाणीनंतर गर्भवती महिलेच्या पोटात दुखु लागल्याने मंडणगड ग्रामीण रूग्णालयात महिलेला दाखल करण्यात आले होते. त्यानंतर अधिक उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात नेत असताना वाटेतच महिलेची प्रसूती झाली. यामध्ये सहा महिन्याच्या अर्भकाचा जन्म झाला. परंतु हे अर्भक पोटातच मृत झाले होते. या घटनेने संतप्त झालेल्या पीडित महिलेने विव्हळत एक व्हिडिओ तयार केला. मारहाण केलेल्यांचा नावाचा उल्लेख या व्हिडिओत महिलेने केला आहे. माझ्या जीवाचे बरेवाईट झाले तर संबधित लोकांना अटक करून शिक्षा व्हावी असे महिलेने म्हंटले आहे
कुटुंबातील एका सदस्याने असे म्हटलेय की, गोवंश हत्येबाबत पोलिसांना या महिलेने माहिती दिली होती. गोवंश हत्येप्रकरणी अनेक तक्रारी महिलेने केल्या होत्या. त्यामुळे या लोकांनी बेदम मारहाण केल्याची प्रतिक्रिया दिली. या प्रकरणात आरोपींना पकडुन कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी ही प्रसार माध्यमांशी बोलताना कुटुंबियांनी केली आहे.