( मंडणगड / दीपक महाडिक )
24 फेब्रुवारी पासून कोकणात शिमगा सणाला सुरू झाली असून मंडणगड तालुक्यातील शेवरे गावातील ग्रामदेवता वरदान देवीच्या उत्सवालाही सूरूवात झाली आहे. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यापासून सुमारे 25 किमी. असलेल्याअंतरावर जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या वरदान देवीचा उत्सव आगळा वेगळा पाहायला मिळतो. वरदान देवी ही मंडणगड, दापोली तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या भक्तजनांच्या हाकेला धावणारी व संकट दूर करणाऱ्या या देवीला 84 गावाची मालकीण असेही संबोधिले जाते. ही देवी नवसाला पावते व भक्तजणांच्या हाकेला धावते म्हणून नवसवाली बाय असेही म्हटले जाते.
शेवरे हे तालुक्यातील साधारण दीडशे उंबरठा असलेले छोटेशे गाव. गावाच्या थोड्याच अंतरावर असलेल्या देव राठीत या वरदान देवीचे देऊळ आहे. या देवळाच्या बाजूला आणखी चार देवळे आहेत त्या पैकी झोलाई, वाघजाई, चनकाई, भैरी अशी देवतांची नावे आहेत. वरदान देवीच्या मूर्ती शेजारी मानाई देवीची मूर्ती आहे. ही देवते पुराणकालीन असून अर्थात पांडवकालीन व्यास मुनींनी स्थापन केलेली ही देवस्थाने आहेत असे म्हटले जाते.
दापोली तालुक्यातील डौली या गावातील ग्रामदेवता जनाईदेवी, मंडणगड तालुक्यातील तोंडली गावातील मानाई देवी, वेसवी नांदगाव येथील काळंबा, तसेच हरिहरेश्वर येथील हरेश्वर देव हे भाऊ बहिण आहेत, असे ऐकायला मिळते. तसेच शेवरे गावातील ग्रामस्थांनी या देवळांचे नूतनीकरण करून भव्य अशी देवळे बांधली आहेत. वरदान देवीचा उत्सव हिंदू धर्माच्या प्रत्येक सणाला साजरा केला जातो. फाल्गुन महिन्यातील शिमगा, दसरा, दिवाळी, हनुमान जयंती, नारळी पौर्णिमा, गोकुळ अष्टमी असे प्रत्येक सण शेवरे ग्रामस्थ स्वखर्चाने साजरा करतात.
सर्वात मोठा उत्सव म्हणजे शिमगा उत्सव. फाल्गुन महिन्यातील पंचमीची होळी झाली की, दुसऱ्या होळीच्या दिवशी वरदान देवीच्या उत्सवाला सुरुवात होते. या दिवशी गावातील सर्व ग्रामस्थ देवळात एकत्र जमून भव्य अशी साधारण 50 फूट लांब व अर्धा फूट रुंद अशी बांबूची काठी घेऊन त्या काठीला ढाल काठी असे म्हटले जाते. त्या काठीला सुंदर रंग बिरंगी कपड्यांनी सजवून उंच टोकावर कळस चढवून देवीचा ध्वज लावून फुलांनी सजवून देवीला देवळाच्या प्रांगणात उभी केली जाते. संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास गावातील सर्व ग्रामस्थ एकत्र जमतात, त्यात मुंबईकर मंडळीही सामील होतात.
सर्वप्रथम गावातील ग्रामदेवतेचा महाडिक पुजारी देवळातील वरदान देवीचे मनोभावे पूजा करून देवीला साकडे घालून 84 गावे मिरवणुकीसाठी नेत आहोत, आनंदाने सर्व खेळी जाणाऱ्या लोकांना सुखाने ने व सुखाने आण अशी विनवणी करून तेथील एक फुल आणून ढाल काठी जवळ आणले जाते व ढाल काठीची पूजा केली जाते. म्हणजे वरदान देवी ढाल काठीवर आरूढ होते. मग सर्व ग्रामस्थ ढाल काठीला घेऊन वाजत गाजत नगारे, घंटा नाद करत देवीला 84 गावाच्या भेटीसाठी नेले जाते. सर्व प्रथम शेवरे गावातील शेजारी असलेल्या नायणे या गावापासून मिरवणूकीची सुरुवात होते. नायणे गावच्या सीमेजवळ देव जाताच नगाराचा आवाज ऐकताच त्या गावातील सर्व महिला पुरुष, मुलेबाळे देवीच्या स्वागतासाठी सामोरे येतात व देवीला खांद्यावर घेऊन पाटलाच्या दारी उभी केली जाते. देवीबरोबर आलेल्या खेळयांचे पाय धुतले जाते व देवीला प्रत्येक महिला खणानारळाने ओटी भरून पूजा करतात. मग देवी बरोबर आलेला पुजारी हातात धुपारती घेऊन देवीला साकडे घालतो. मग त्या गावातील सर्वांची आरती झाली की दुसऱ्या गावात देवीला नेले जाते.
प्रत्येक देवीला पाटलाच्या दारी उभी करून त्या गावातील ही स्त्रिया देवीची ओटी भरून पूजा करतात. तर काही ठिकाणी मानकरी असलेल्या ठिकाणी देवीला उभी केली जाते. गावातील प्रत्येक स्त्री देवीची ओटी भरते, मग पुजारी प्रत्येक घरातील व्यक्तींच्या नावाने देवीला त्या कुटुंबाला सुखी ठेवण्यासाठी घरात शांतता लाभावी असे गाऱ्हाणे घालतो. प्रत्येक जण देवीला नवस करतात. कोणी 5 नारळाचा तोरण तर कोणी 10 नारळाचे तोरण नवस करतात आणि वरदान देवी नक्कीच नवसाला पावते, बाणकोट वेशवी कोळी वाड्यात तर देवीचे आगमन होईल त्या दिवशी कोळीवाडा रस्ता शेणाने सारवून रांगोळी काढली जाते. देवी कोळीवाड्यात गेली की देवीच्या स्वागतासाठी सामोरी येतात. रात्री कोळीवाड्यात उत्साह असतो कोळी भगिनी गाणी गात असतात. पूर्वी वेसवी येथून देवीला हरी हरेश्वर देवाच्या भेटीसाठीही नेले जात असे पण हल्ली खेळी कमी असल्याने तेथे जाणे अवघड जाते.
वेसवी झाली की सर्व आजूबाजूची गावे तेथून जावळे आंबोली चिंचघर या बहुतेक मंडणगड तालुक्यातील गावातून मिरवणूक झाली की दापोली तालुक्यातील मंदिवली गावापासून दापोली तालुक्यातील गावात मिरवणुकीसाठी नेले जाते. दिवस रात्र देवीची मिरवणूक असते. प्रत्येक खेडेगावातील महिला भगिनी आपआपल्या सीमेजवळ देवीला न्यायला येतात व सोडायलाही येतात. प्रत्येक स्त्री देवीच्या नावाने गाणी गात असतात, गावोगावातून देवीला नवस केले जातात व देवी पुढल्या वर्षी कधी येईल याची आतुरतेने वाट पहात असतात. देवीचे खास वैशिष्ट्य म्हणजे एखाद्या भक्ताचा नवस दयायचे राहून गेले असेल तर देवी त्या भक्ताच्या स्वप्नात जाते. लहान मुलांच्या अंगावर काही बाधा होऊ नये म्हणून देवीच्या पायथ्याशी मुलांना एक तांब्याने आंघोळ घालतात.
मंडणगड तालुक्यातील तुळशी या गावात या देवीचे जल्लोष आणि स्वागत केले जाते. रात्रभर देवीचा उत्सव उत्साहाने आनंदाने साजरा करतात काही गावातील ग्रामदेवतेच्या पालख्यानची भेटही देवी जवळ होते. अशा तऱ्हेनं सात दिवस अहोरात्र उन्हातान्हातून देवीची मिरवणूक काढून आठव्या होळीच्या दिवशी देवीला आतले गावी आणले जाते. आतले गावात वरदान देवीचा जल्लोषात स्वागत केले जाते. आतले गावातील सर्व भक्त जणांचे नवस आरती झाल्यावर वरदान देवीला शेवरे गावात नेण्यासाठी आतले गावातील माय भगिनी शेवरे, आतले गावच्या सीमेपर्यंत निरोप देण्यासाठी येतात. खास वैशिष्ट्य म्हणजे मुस्लिम, बौद्ध बांधवही देवीच्या दर्शनासाठी भाग घेतात. आतले शेवरे गावातील सीमेजवळ देवीचे आगमन होताच शेवरे गावातील महिला पुरुष देवीला आपल्या गावात नेण्यासाठी येतात. त्या दिवशी संपूर्ण गावातील रस्ता शेणाने सारवून रांगोळी काढली जाते. अगदी वाजत गाजत लेझीम खेळत सनई ढोल नगारा, घंटा वाजवत रात्री दहाच्या सुमारास गावात आणले जाते.
मुंबईकर चाकरमानी या दिवशी आपल्या लाडक्या देवीच्या स्वागतासाठी येतोच. देवीला वरदान माते की जय असे जयजयकार करून देवीला बरेच जण उभी करून नाचवत असतात. तेही फक्त एक एक व्यक्तीने नाचवायची असते. बऱ्याच जणांना नाचविणे अवघड जाते. मग देवीला पाटलाच्या दारी उभी केली जाते. रात्रभर जागरण केले जाते. दुसऱ्या दिवशी सलग दोन दिवस गावात देवीची मिरवणूक काढून देवीची मनोभावे पूजा केली जाते. गावातील प्रत्येक घराघरातील कुटुंब आपल्या देवीची पूजा करतात. स्त्रिया मंडळी खणानारळाने ओटी भरून आपल्या कुटुंबाला सुखी ठेवण्यासाठी साकडे घालतात. अगदी तोही दिवस उत्साहाचा असतो गावातील कलावंत मंडळीं मनोरंजनाचा कार्यक्रम सादर करतात. अखेर रात्री 11 वाजताच्या सुमारास देवीला वाजत गाजत गावातील होळीच्या ठिकाणी नेले जाते. गावातील होळी पेटवून झाली की देवीची होळी भोवती प्रदक्षिणा घालून देवीला वाजत गाजत गुलाल उधळत देवळातील सहाणेवर नेले जाते. रात्री देवळातील होळी पेटवून होळी भोवती देवीला प्रदक्षिणा घालून उभी केली जाते. तेथेही जल्लोष असतो. दुसऱ्या दिवशी धुळवट म्हणजे त्या दिवशी सहाना असते. सहाणेवर गावातील सर्व लहान मुले स्त्रिया मंडळी येतात. मुली देवीची शिमग्याची गाणी म्हणतात. तर सहाना भरून झाल्या की पुजारी देवीची मनोभावे पूजा करून तेथील फुल देवळातील देवी जवळ नेले जाते व तेथेही पुजारी पूजा अर्चा करतो. म्हणजे वरदान देवी देवळात स्थानबद्ध झाली, अशी भावना आहे. अशा तर्हेने शिमगा सण येथेच समाप्त होतो. दुसऱ्या दिवशी चाकरमानी शहरात वळतो माहेरवाशिणी आपल्या सासरी जातात. शेतकरी वर्ग आपली पुढील कामे करण्यास लागतो. मात्र वरदान देवीच्या दर्शनासाठी भक्तजन येत जात असतात. खास करून देवीला कौल लावण्यासाठी भक्त जण येतात. उन्हाळा असो की पावसाळा असो भक्त जणांची देवीच्या दर्शनाला रिघच असते.