(रत्नागिरी)
कासवांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंडणगड मधील वेळास समुद्रीकिनारी कासवांसाठी भारतातील पहिले प्रस्तावित राखीव क्षेत्र घोषित करण्यासाठी अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनी पाहणी केली. या प्रसंगी काही महत्त्वाच्या सूचनाही त्यांनी वनविभागाला केल्या आहेत. तसेच क्षेत्र परवानगीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. व्ही. क्लेमेंट बेन रत्नागिरी (चिपळूण) यांनी वनविभागातील दापोली वनपरिक्षेत्रामध्ये कासवांचे गाव म्हणून प्रसिद्धीस आलेल्या वेळास येथे भेट दिली. त्यांनी वेळास समुद्रकिनारी येथे २०२२-२३ मधील ऑलिव्ह रिडले समुद्री कासव संवर्धन व संरक्षण सुरू असलेल्या कामाची पाहणी करून वेळास येथील कासवमित्रांशी चर्चा केली.
यावेळी श्री. व्ही. क्लेमेंट बेन यांनी समुद्री कासवाचे अंड्यांचे घरटे, समुद्रकिनाऱ्यावरून हॅचरीमध्ये स्थलांतरण न करता, कासव मादीने तयार केलेल्या घरट्याचे नैसगिकरित्या संवर्धन व संरक्षण (इनसिटू) करणेबाबत भर देण्याच्या सूचना परिक्षेत्र वन अधिकारी दापोली यांना दिल्या, त्यानंतर त्यांनी वेळास येथील ग्रामस्थांची वेळास समुद्रकिनारा समुद्री कासव संवर्धन राखीव क्षेत्र म्हणून घोषीत करण्याबाबत सविस्तर चर्चा केली, त्यामध्ये त्यांनी हे क्षेत्र संवर्धन राखीव क्षेत्र म्हणून घोषित झाल्यावर होणारे फायदे व प्रतिबंध या विषयी मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे मौजे वेळास येथील गृहपर्यटनाला (होमस्टे) भेट देऊन, गृहपर्यटन वाढीस चालना देण्याकरीता वेळासमधील गृहपर्यटनांची माहिती कांदळवन प्रतिष्ठान मुंबई यांचे संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याच्या सूचना परिक्षेत्र वन अधिकारी कांदळवन कक्ष रत्नागिरी यांना दिल्या.