( संगमेश्वर / प्रतिनिधी )
लोकांमध्ये योगाविषयी जनजागृती व्हावी, मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांचे आरोग्य सुदृढ व्हावे यासाठी योगगुरू दिनेश पेडणेकर यांनी ध्यास घेतला आहे. ते 25 वर्षे अबाल वृद्धांची सेवा करून त्यांना योगाच्या माध्यमातून आयुष्य प्रफुल्लित करत आहेत. मंडणगड सारख्या दुर्गम भागातील लोकांना योगाच्या साधनेतून आनंददायी जीवन कसे जगावे हे त्यांनी शिकवले. परिस्थिती अत्यंत कठीण असतानाही त्यांनी कधी कोणासमोर हात पसरले नाहीत. अशा या मंडणगड येथील योग गुरू दिनेश पेडणेकर यांनी संगमेश्वर, देवरूख येथे चार ठिकाणी योगाची शिबिरे घेतली.
श्री. दिनेश पेडणेकर मंडणगड तालुक्यात गेली २१ वर्षे योगप्रसाराचे कार्य करीत आहेत. द योग इन्स्टिट्युट सांताक्रुझ, मुंबईची क्लासिकल पद्धत सर्वसान्य गृहस्थींपर्यंत नेण्यासाठी मंडणगड तालुक्यात अगदी गावपातळीवर त्यांनी योगाचे प्रकल्प उभे केले आहेत. त्या प्रकल्पाच्या माध्यमातून मुलांसाठी – योगसंस्कार वर्ग, प्रौढांसाठी- ग्रामीण योग केंद्र, व वृद्धांसाठी- वानप्रस्थाश्रम असे तीन योग प्रकल्प ते घेत आहेत. त्यांच्या या योगाचा प्रचार आणि प्रसार व्हावा. तसेच लोकांच्या आरोग्याला पुष्टी मिळावी यासाठी देवरुख येथे ॲड.भक्ती सागर मुरुडकर व श्री. गौतम गमरे (निवृत्त, विस्तार अधिकारी ) सौ. प्रिया गमरे आरोग्य विभाग यांनी विशेष परिश्रम घेऊन हे शिबिर उत्साहात पार पाडले.
शास्त्रशुद्ध योगाचे हे ज्ञान संगमेश्वर तालुक्यातील देवरुख /संगमेश्वर वाशियांना मिळावे म्हणून काही योग प्रेमी- श्री.प्रकाश घस्ते, सौ. शिला घस्ते, ॲड.पूनम चव्हाण, सौ. शुभांगी बेलवलकर, श्री. अशोक कुमटेकर, श्री.सागर मुळ्ये, श्री. सुरेश करंडे, श्री.बोरसुतकर गुरुजी,श्री. प्रमोद शेटे,श्री.शरद गायकवाड इ. पुढे सरसावले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शनिवारी दि.10 डिसेंबर रोजी देवरूख शाळा क्रमांक-३ येथे शिबिर पार पडले. त्यानंतर मौजे.हरपुडे या ठिकाणीही हे शिबीर घेण्यात आले. पुढे सांदिपनी गुरुकुल, कुडवली येथेही योग शिबिराला लोकांनी उत्तम प्रतिसाद दिला. तसेच ज्येष्ठ नागरिक संगमेश्वर येथेही योग गुरु श्री.पेडणेकर यांनी क्लासिकल योगाची ओळख करून दिली. त्यामुळे वृध्द व्यक्तींना जगण्यातील आनंद मिळाला. योगाच्या माध्यमातून केवळ आसनांवर भर देऊन वाटचाल करणाऱ्या पद्धतीला फाटा देत पेडणेकर यांनी योगाचे वास्तव रूप समोर ठेवले. आणि ते सर्वांना पटले ही. ते पाहून योग आणखी पुढे शिकण्याची जिज्ञासा देवरूख/संगमेश्वर वासियांमध्ये निर्माण झाली आहे. लवकरच अशा प्रकारची आणखी शिबिरे आपण घेऊ असे त्यांनी सांगितले.
पेडणेकर यावेळी म्हणाले, विविध उपक्रम, शिबीरे मुलांसाठी, प्रौढांसाठी, वृद्धांसाठी
घेण्यात येणार आहेत. त्यामध्ये – योग, खेळातून स्वतःची आणि योगाची ओळख, शरीर मनाची ओळख, एकाग्रता स्थिरता व स्मरणशक्ती वाढवणारी योगासने., मुलांचा सर्वांगीण विकास कसा करावा मुले, प्रौढ व वृद्ध यांच्या समस्या व निराकरण अशा विविध विषयांवर योग, खेळ यामधून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच ऑनलाइन योग वर्गही घेण्यात येणार आहेत. आपल्याला योगविषयी अधिक माहिती घ्यावयाची असल्यास आनंद विहार आश्रम 9420167413 या ठिकाणी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.