(खेड / भरत निकम)
महामार्गावरील भोस्ते घाटातील अवघड वळणावर अचानक ब्रेक निकामी झालेला कंटेनर उलटला आहे. अमरनाथ पासी (३२, रा. देवरिया, उत्तर प्रदेश) असे जखमी चालकाचे नाव असून ही घटना सोमवारी, सकाळी ११:३० वाजताच्या सुमारास घडली.
मुंबई गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात सातत्याने अपघात होत आहेत. गोव्याहून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांना तीव्र उतारानंतर वळणदार रस्ता असल्याने येथे सतत अपघात होतात.
गोव्याकडून मुंबईच्या दिशेने निघालेला कंटेनर (नं. एमएच ४६ बीएफ २२४५) चे अचानक ब्रेक निकामी झाले आणि तो उताराच्या रस्त्यावर बाजूला उभारलेल्या भिंतीवर आदळून उलटला आहे. अपघातात कंटेनरचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून तो अपघातात तीन ते चार ठिकाणी आदळला आहे. कंटेनर चालक अमरनाथ पासी हा केबिनमध्ये अडकला होता. अपघातानंतर मदतकर्त्यांनी चालकास बाहेर काढून सद्गुरू नरेंद्र महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेतून कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. तेथे त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
महामार्गावरील भोस्ते घाटातील तीव्र उतार आणि अचानक समोर येणारे वळणदार रस्ता आहे. यामुळे वाहनं चालकाच्या लक्षात ही बाब येत नाही. चौपदरीकरणाचे काम करताना महामार्ग विभागाचे अधिकारी यांनी ही गोष्ट वरीष्ठांच्या लक्षात आणून दिली नाही. त्यामुळे येथे अपघातांची मालिका सुरुच आहे. सततचे अपघात घडत असल्याने या ठिकाणी मोठा अपघात होवून अनेक जीव गेल्यानंतर महामार्ग विभागाचे डोळे उघडणार आहेत का? असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.
फोटो – सोबत महामार्गावरील भोस्ते घाटातील वळणावर झालेल्या कंटेनरची झालेली दुरवस्था दिसत आहे.
(छाया प्रसाद गांधी, खेड)