(मंडणगड)
तालुक्यातील भिंगळोली येथील एका हॉटेलसमोर पोलिसांनी काळविटाची तब्बल सहा शिंगे जप्त केली आहेत. या कारवाईत शामराव धोंडीराम देवकर (५०, रा. इंद्रानगर झोपडपट्टी, वैरागी, ता. बार्शी, सोलापूर) याला अटक केली आहे. ही कारवाई रविवारी (५ नोव्हेंबर) पहाटे ३ वाजता करण्यात आली.
भिंगळोली येथील हॉटेलसमोरील रस्त्यावर श्यामराव देवकर संशयीतरीत्या उभा होता. गस्तीवरील पोलिसांनी त्याची झडती घेतली असता पिशवीमध्ये काळवीट प्राण्याची शिंगे सापडली. त्याच्याकडून १६ इंच लांबीचे १ शिंग, १५.५ इंच लांबीची २ शिंगे, १५ इंच लांबीचे १ शिंग, १४.०५ लांबीची २ शिंगे पोलिसांनी जप्त केली आहेत.
पोलिसांनी वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम ३९, ४४, ४८, ५१ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक नितीन गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक तुळशीराम सावंत करीत आहेत.