जय जय रघुवीर समर्थ. साधू वेगवेगळे दिसतात परंतु ते सगळे स्वरूपाला मिळालेले असतात. सगळे मिळून एकच देहातीत वस्तू झाले आहेत. ब्रम्ह नवे जुने नाही, ब्रम्ह अधिक उणे नाही, ज्याला वाटेल तो देह्बुधीचे कुत्रे मानावे. देहबुद्धीच्या संशयामुळे समाधानाचा क्षय होतो, समाधानाची वेळ चुकते. देहाचे मोठेपण हे देहबुद्धीचे लक्षण असून देह मिथ्या असल्याचे जाणून विवेकी लोक देहाची निंदा करतात. जोपर्यंत मरण येत नाही तोपर्यंत देशाचा अभिमान धरतात त्यामुळे त्यांना पुन्हा देहबुद्धी मुळे पुनर्जन्म घ्यावा लागतो.
मोठेपणामुळे समाधानामध्ये कमतरता येते, देह केव्हा पडेल हे सांगता येत नाही. त्यामुळे हित देहाच्या पलिकडचे आहे असे संतांनी सांगितले आह देहबुद्धीमुळे अहित होते. सिद्धीचे सामर्थ्य प्राप्त झाल्यामुळे योग्यांना देखील देहबुद्धीची उपाधी त्रासदायक ठरते. म्हणून देहबुद्धी झडते तेव्हा परमार्थ घडतो. देहबुद्धीमुळे ब्रह्माशी असलेली ऐक्यता बिघडते. माणसाचा विवेक परमेश्वर प्राप्तीकडे ओढ घेतो, तिथून देहबुद्धीचा कस लागतो, अहंकार वेगळेपणा निर्माण करू पाहतो. त्यामुळे चतुर माणसाने देहबुद्धीचा त्याग करावा आणि खरोखरचे ब्रह्म मिळवीत जावे. खरे ब्रम्ह कोणते आहे? असा श्रोत्याने प्रश्न केला. त्याचे उत्तर वक्ता श्रोत्यांना देत आहे. ब्रह्म एकच आहे पण ते अनेकविध असल्याचे भासते. जितके अनुभव येतात तितके नाना मतीप्रमाणे व्यक्त होतात. जे जे अनुभवले, तेच त्यांनी मानले, त्यावर त्यांच्या अंतःकरणाने विश्वास ठेवला.
ब्रह्म नाम रूपातीत आहे, तरी त्याला अनेक नामे आहेत. निर्मल,निश्चल, निवांत, निजानंद, अरूप, अलक्ष, अगोचर, अच्युत, अनंत, अपरंपार, अदृश्य, अतर्क्य, अपार अशी अनेक नामे आहेत. नाद रूप, ज्योती रूप, चैतन्य रूप, सत्तारूप, सस्वरूप अशी अनेक नावे आहेत. शून्य आणि सनातन, सर्वेश्वर आणि सर्वज्ञ, सर्वात्मा जगजीवन अशी अनेक नावे आहेत. सहज आणि सदोदित, शुद्ध, बुद्ध, सर्वातीत, शाश्वत आणि शब्दातीत अशी नावे आहेत.
विशाल, विस्तीर्ण, विश्वंभर, विमल वस्तू, व्योमाकार, आत्मा, परमात्मा, परमेश्वर अशी नावे आहेत. परमात्मा, ज्ञानघन, एकरुप, पुरातन, चिद्रूप, चिन्मात्र, अशी असंख्य नावे आहेत. मात्र अशी अनेक नावे असली तरी परेश नामातीत आहे. तो समजावा म्हणून ही नावं ठेवलेली आहेत. तो म्हणजे विश्रांतीचा विश्राम, आदि पुरुष, आत्माराम, तो एकच परब्रम्ह दुसरं काही नाही. तो कळण्यासाठी चौदा ब्रह्म्यांची लक्षणे सांगितली जातात. त्यातून खोटे बाजूला काढले की उरते ते खरे असते. शास्त्राच्या आधाराने चौदा ब्रह्मे आहेत असे बोलले जाते. इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ब्रह्म निरूपण नाम समास द्वितीय समाप्त.
जय जय रघुवीर समर्थ.
– पद्माकर देशपांडे
(निरूपणकार पत्रकार / लेखक)
मोबा. 9420695127