मागे आपण मुमुक्षुची लक्षणे पाहिली. आता साधक कसा असतो त्याचे लक्षण ऐका. अवगुणांचा त्याग करून संतांचा संग धरलेला आहे त्याला साधक असे म्हणतात. जो संताना शरण गेला, संतांनी त्याला आश्वासन दिले, मग त्यालाच विविध ग्रंथांमध्ये साधक म्हटलेले आहे. संसाराचे बंधन तुटले, आत्मज्ञानाचा उपदेश झाला, त्याचे निश्चयपूर्वक साधन करतो त्याचे नाव साधक.
श्रवणाची आवड धरतो, आद्वैत निरुपणाची गोडी लागते, मनन करून अर्थाचा शोध घेतो त्याचे नाव साधक. सारासार विचार होऊन संशय नष्ट होऊन आत्मज्ञानाचा विचार करतो, संशयाची निवृत्ति होते आत्मज्ञान पाहतो. संदेह नाहीसा होण्यासाठी तो संतांची संगती धरतो, आत्म,शास्त्र, गुरु, प्रचीतीसाठी प्रयत्न करतो, विवेकपूर्वक देहबुद्धी दूर सारतो, आत्मबुद्धी धरतो, श्रवण मनन करीत राहतो याचे नाव साधक. समोरील दृश्यभान जग विसरून आत्मज्ञान दृढ करतो, विचारांनी मनाचे समाधान करतो त्याचे नाव साधक. द्वैताची उपाधी तोडून अद्वैत परब्रह्मस्वरूप साधनेसाठी ऐकतेची समाधी लावतो त्याचे नाव साधक.
जीर्ण झालेल्या आत्मज्ञानाचा जीर्णोद्धार करतो आणि विवेकाने पैलपार पावतो, याचे नाव साधक. उत्तम साधूची लक्षणे निरूपण वाचून स्वतः अंगीकारतो, स्वरूपाकार होण्याचा प्रयत्न करतो, त्याचे नाव साधक. दिवसेंदिवस अवगुणांचा त्याग करतो, उत्तम गुणांचा अभ्यास करतो, स्वरूपाकडे ज्याचे लक्ष लागते त्याचे नाव साधक. वाईट क्रिया सोडली, सत्क्रिया वाढविली, त्याच्या बळामुळे दृश्य विश्वाचे त्याला आकर्षण राहत नाही. सदा स्वतःच्या स्वरूपामध्ये विलीन होतो त्याचे नाव साधक. दिवसेंदिवस अवगुणांचा त्याग करतो, उत्तम गुणांचा अभ्यास करतो, स्वरूपाचा त्याला निजध्यास लागतो. मायेकडे लक्ष देत नाही आणि डोळ्यांना न दिसणारे स्वरूप आहे त्याचा विचार करतो त्याचे नाव साधक. लोकांनी जे बाजूला सारले, त्याचे अनुमान बांधले नाही, ते ज्याने दृढ केले त्याचे नाव साधक. ज्याचे नाव घेताच वाचा कुंठित होते, जे डोळ्यांना दिसत नाही, ते नाना परीने साधतो त्याचे नाव साधक. जे मिळवु पाहता मिळवता येत नाही, पाहु जाता दिसत नाही, त्याचा अनुभव मनाने घेतो त्याचे नाव साधक. जिथे मनच नष्ट होते, जिथे तर्क पांगळा होतो, तो अनुभव जो घेतो त्याचे नाव साधक. अनुभवाच्या योगाने वस्तू साधतो आणि ती वस्तू तो स्वतः होतो त्याचे नाव साधक. अनुभवाच्या अंगाने जातो योग्यांच्या वाटेवरून राहतो काही न होऊन असतो त्याचे नाव साधक. असाध्य वस्तू साधनाद्वारे साध्य करतो, स्वरूपाकडे दृढ बुद्धी धरतो, वरवरच्या उपाध्या दूर सारतो त्याचे नाव साधक. देव आणि भक्ताचे मूळ शोधून पाहतो, तात्काळ साध्यच होतो त्याचे नाव साधक.
विवेकाच्या बळामुळे मीपणा गुप्त होत जातो, अपोआप मावळतो, दिसतो पण त्याला कुणी पाहिलेच नाही नाही. त्याने मी पण मागे सोडून दिले. स्वतःच स्वतःला शोधले. तुर्यावस्थाही ओलांडली त्याचे नाव साधक. पुढे उन्मनेच्या शेवटी आपली आपल्याला अखंड भेट होते. ज्याची अखंड दृष्टी अनुभवते त्याचे नाव साधक. द्वैताचा संबंध तोडला, भासाचा भास मोडला, देहात असूनही विदेही झाला त्याचे नाव साधक. अखंड स्वरूप व स्थिती प्राप्त झाली. देहाचा अहंकार नाही. सर्व संशयापासून निवृत्त झाला, त्याचे नाव साधक. पंचमहाभूतांचा विस्तार स्वप्नाप्रमाणे वाटतो, निर्गुणावर ज्याचा विश्वास आहे त्याचे नाव साधक. साधकाची आणखी काही लक्षणे पुढील भागात पाहू या.
जय जय रघुवीर समर्थ.
– पद्माकर देशपांडे
(निरूपणकार पत्रकार / लेखक)
मोबा. 9420695127