खूप कल्पना, खूप कामना, खूप पत्र तृष्णा, खूप वासना, खूप ममता, खूप भावना याचे नाव बध्द. खूप संशयी, खूप दु:खी,खूप मूर्ख, नातलगांचा खूप हव्यास असणारा, खूप प्रापंचिक, खूप उपाधी करणारा त्याचे नाव बध्द. खूप वाचाळ, खूप पाखंडी, खूप दुर्जन, खूप थोतांडी, खूप रानटी, खूप खोडसाळ याचे नाव बध्द. खूप नास्तिक, खूप भ्रांती बाळगणारा, खूप पसारा बाळगणारा, खूप आळशी याचे नाव बध्द. खूप कंजूस, खुप दांडगा, खूप मत्सरी, खूप मस्तीखोर, खूप शास्त्रविरुद्ध वर्तन करणारा याचे नाव बध्द. परमार्थाविषयी अज्ञान, प्रपंचाचे उदंड ज्ञान, स्वतःचे समाधान जाणत नाही याचे नाव बध्द.
परमार्थाचा अनादर, प्रपंचाचा अत्यादर, संसाराच्या भाराने त्रस्त याचे नाव बध्द. सत्संगाची गोडी नाही, संतांची निंदा करण्याची आवड, देह बुद्धीची घातली बेडी त्याचे नाव बध्द. हाती पैश्याची जपमाळ, सदैव बायकोचे ध्यान करतो, सत्संगाचा दुष्काळ त्याचे नाव बध्द. डोळ्यांनी पैसा, बाया पाहाव्या, कानांनी पैसे स्त्रीचे वर्णन ऐकावे, चिंतन स्त्रिया आणि पैशाचे करावे याचे नाव बध्द. काया वाचा आणि मन, चित्त वित्त जीव प्राण द्रव्य दारेचे करी भजन त्याचे नाव बध्द. इंद्रिये शांत करून क्षणभर देखील राहत नाही, पैसा आणि स्त्रीसाठी सर्व लावतो त्याचे नाव बध्द. पैसे आणि स्त्री हेच तीर्थ, पैसे आणि स्त्री हाच परमार्थ, पैसे आणि स्त्री हा स्वार्थ असे म्हणतो तो बध्द. व्यर्थ काळ गमावतो, सर्व काळ संसाराची चिंता करतो, कथा किर्तन करत नाही त्याचे नाव बध्द. नाना चिंता, नाना उद्वेग, नाना दुःखांचे संसर्ग, करतो परमार्थाचा त्याग त्याचे नाव बध्द. तीर्थ यात्रा दान पुण्य भक्ती कथा निरूपण मंत्र पूजा जप ध्यान सर्वकाही द्रव्य आणि स्त्री साठी करतो, जागृती स्वप्न आणि रात्रंदिवस त्याला विषयाचा ध्यास लागलेला असतो तो क्षणाचाही उसंत घेत नाही त्याचे नाव बध्द. अशी ही बध्दाची लक्षणे असून मुमुक्षुची लक्षण पुढल्या समाजामध्ये सांगतो. इतिश्री दासबोधे गुरुशिष्यसंवादे बद्ध लक्षण नाम समास सप्तम समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.
दशक पाचवा समास आठवा मुमुक्षुची लक्षणे
जय जय रघुवीर समर्थ. संसाराच्या गर्वामुळे नाना हीन कुलक्षणे निर्माण होतात त्याचे अवलोकन केले असता दोषच लागतात. असा जो प्राणी संसारामध्ये बध्द झालेला आहे त्याला अखेरीस खेद प्राप्त होतो. संसारातील दुःखामुळे दुखावला जातो, त्रिविध तापांनी पोळला जातो, अंतर्यामी पस्तावतो. प्रपंचाविषयी उदास झाला, त्याने विषयाविषयी त्रास घेतला, आता संसाराचा हा हव्यास कमी व्हावा. सगळा प्रपंच निष्फळ आहे, येथील श्रम वाया जाणारे आहेत, आता काही काळ आपले सार्थक करू अशा प्रकारची त्याची बुद्धी विचार करायला लागते. त्याला तशी तळमळ लागते. तो म्हणतो माझं वय, सगळा वेळ वाया घालविला.
पूर्वी अनेक दोष निर्माण झाले ते सगळे त्याला आठवतात. त्याच्या मनात ते उभे राहतात. यमयातना आठवतात, मनाला भीती वाटते, आपल्या पापाची गणना करता येणार नाही असं त्याला वाटतं. आपण पुण्याचा विचार केला नाही, पापाचे डोंगर उभे राहिले, आता हा दुस्तर संसार कसा तरायचा? आपले दोष झाकून ठेवले दुसऱ्या चांगल्या लोकांना गुणदोष लावले, देव, साधू, सज्जन यांची व्यर्थ निंदा केली, निन्देसारखा दोष नाही, ते पण माझ्याकडून घडलं! माझे हे अवगुण आकाशांत बुडून जावोत. मुमुक्षुची लक्षणे समर्थ रामदास स्वामी सांगत आहेत पुढील कथेत ती ऐकू या!
जय जय रघुवीर समर्थ.
– पद्माकर देशपांडे
(निरूपणकार पत्रकार / लेखक)
मोबा. 9420695127