सद्गुरुवचन गहनापेक्षाही गहन आहे, असे तू जाण. सद्गुरु वचनामुळे समाधान मिळते हे निश्चित. सद्गुरुचे वचन म्हणजे वेदांत, सद्गुरुचे वचन म्हणजेच सिद्धांत, सद्गुरुचे वचन म्हणजे धादांत प्रचिती. माझ्या स्वामीचे वचन अत्यंत गहन असून त्यामुळे माझ्या मनाचे अत्यंत समाधान झाले आहे.माझ्या जिविची गुप्त गोष्ट मी तुला सांगतो तरी लक्षपूर्वक याच क्षणी तू ऐक. शिष्याने म्लान वदनाने सद्गुरूंची पाऊले धरली. मग गुरुदेवांनी बोल आरंभिले.
अहम ब्रह्मास्मि हे वाक्य आहे याचा अर्थ अतर्क्य आहे तोही सांगतो. शिष्या ऐक, तू स्वतःच ब्रह्म आहेस याविषयी भ्रम धरू नको. नवविधा प्रकारे भजन त्यामध्ये मुख्यत्वे आत्मनिवेदन संपुर्णपणे मी तुला सांगतो. निर्माण झालेली ही पंचमहाभूते कल्पांताचा नाश झाल्यावर यथाकाळ नष्ट होतात. प्रकृती आणि पुरुष हे देखील ब्रह्मामध्ये विलीन होतात. दृष्य पदार्थ म्हटल्यावर आपणही उरत नाही. त्यामुळे ऐक्यरूप आहेच. ऐक्य असल्याने सृष्टीही नाही तिथे पिंड-ब्रम्हांड कुठे दिसेल? ज्ञानरूपी अग्नी प्रकट झाल्यावर दृश्य केरकचरा निघून जातो. तदकारामुळे भिन्नत्व नाहीसे होते. साक्षात्कारानंतर जरी वृत्ती उद्भवली तरी ती जगत सत्यत्वाने पाहत नसल्याने दृश्य प्रपंच असूनही नसल्यासारखाच होतो. अशाप्रकारे सहज आत्मनिवेदन होते. गुरूच्या ठाई अनन्यभक्ती असेल तर तुला कोणतीही चिंता करण्याचे कारण नाही; कारण दोघांमध्ये वेगळेपण उरतच नाही. आता हे दृढ करण्यासाठी सद्गुरुचे भजन करीत जा! सद्गुरु भजनामुळे निश्चितपणे समाधान लाभेल. यालाच आत्मज्ञान असे नाव आहे त्यामुळे समाधान मिळते व संपूर्ण मिथ्या असलेले भवभयाचे बंधन नष्ट होते.
ज्या नराला आपण म्हणजे देहच आहे असे वाटते तो आत्महत्यारा जाणावा. देहाच्या अभिमानामुळे त्याला जन्म-मरण भोगावे लागतात. चार देहापासून वेगळा असलेला जन्म कर्मापासून निराळा असतो. तू म्हणजे आब्रह्म स्तंभापर्यंतचा सर्व विश्वप्रपंच आहेस. कोणालाही बंधन नाही भ्रांतीमुळे लोक भुलले आहेत म्हणून त्यांनी खोटा देहाभिमान घेतलेला आहे. शिष्याने एकांतात बसावे, स्वरूप विश्रांती घेत जावे. त्या गुणांनी परमार्थ वाढवावा. अखंड श्रवण, मनन घडले तरच समाधान मिळेल. पूर्ण ब्रह्मज्ञान झाल्यावर अंगामध्ये वैराग्य निर्माण होईल. हे शिष्य! मुक्तपणाने उच्छ्रुंखल इंद्रियांचे निरंकुश वर्तन केल्यास तुझी तळमळ जाणार नाही. विषयांपासून वैराग्य निर्माण झाले त्यालाच पूर्ण ज्ञान झाले. सोंगटी टाकून राज्य मिळाले! हा मणी म्हणजे सोंगटी होती रुद्र शिंगाची, त्याचा लोभ धरून मूर्खपणे राज्याचा अव्हेर केला. हे शिष्या सावधान होऊन ऐक, आता मी भविष्य सांगतो.
ज्या पुरुषाला जे ध्यान करावेसे वाटते तेच त्याला प्राप्त होते; म्हणून अविद्या सोडून सुविद्या धरावी. त्यामुळे जगाला वंदनिय ठरशील. सन्निपात ज्वराचे दुःख भयानक असते परंतु औषध घेतल्यावर सुख आनंद निर्माण होतो त्याप्रमाणे अज्ञानरूपी संनितापामुळे मिथ्या दृष्टीला दिसते ते ज्ञानरूपी औषध घेतल्यावर मुळीच नाही असे लक्षात येते. खोट्या स्वप्नांमध्ये ओरडला, तो जागृतीस आला त्यामुळे निर्भय पूर्वस्थितीला आला. खोटेच पण खरे वाटले त्यामुळे दुःख झाले, जे मिथ्या आहे अस्तित्वात नाही त्याचे निरसन होणे शक्य नाही. जो जागृत आहे त्याला ते खोटे परंतु झोपलेला आहे त्याला त्याने फसवले. जाग आल्यानंतर त्याची भीती नाही. अविद्यारूपी झोप येताच सर्वांगी कापरे भरते, त्यामुळे श्रवण मनांनाद्वारे पूर्ण जागृती करावी.
जो विषयापासून आतमधून पूर्ण विरक्त आहे ही जागृतीची ओळख आहे. ज्याच्याकडे विरक्ती नाही तो साधक आहे असे जाणावे त्याने आपले मोठेपण बाजूला ठेवून साधन करीत राहावे. साधन करायचं नाही, मी सिद्ध आहे मला साधन कशाला असे म्हणणारा वास्तविक पाहता बंधनामध्येच असतो त्यापेक्षा ज्ञानाचा अधिकारी असलेला मुमुक्षु चांगला. तेव्हा शिष्याने प्रश्न विचारला बद्ध आणि मुमुक्षुचे लक्षण कोणते? साधक आणि सिद्धाची ओळख कशी जाणावी? याचे उत्तर पुढल्या समासात देत आहे ते श्रोत्यांनी सावधपणे ऐकावे. इतिश्री दासबोधे गुरुशिष्यसंवादे शुद्ध ज्ञान निरूपण नाम समास षष्ठम समाप्त.
जय जय रघुवीर समर्थ.
– पद्माकर देशपांडे
(निरूपणकार पत्रकार / लेखक)
मोबा. 9420695127