मुळातच ब्रह्म निराकार आहे तिथे एकोहम् बहुस्याम असा विचार आहे. हा पंचभूतांचा विचार ज्ञान दशकांमध्ये सांगितला आहे. अहंकार वायुरूप आहे त्याच्यावर तेजाचे स्वरूप आलेले आहे, त्या तेजाच्या नंतर तिथे आप म्हणजे पाण्याचे आवरण निर्माण झाले. त्या आवरणाच्या वर नागाने फणा धरलेला त्याच्यावर छपन्न कोटी वसुंधरा विस्तारली. त्यावर सप्तसागर, मध्ये मोठा महामेरू अष्ट दिग्पाळ परिवार असे निर्माण झाले आणि अशा प्रकारे हा संसार वाढत राहिला.
सुवर्णाचा महामेरू जो आहे त्याचा पृथ्वीला आधार आहे ८४ सहस्त्र योजने ही त्याची रुंदी आहे. त्याची उंचीही खूप मोठी आहे. भूमीमध्ये सोळा सहस्त्र वेढे त्याने घातलेले आहेत. त्याच्याभोवती लोकालोक पर्वत पसरला आहे. त्याच्या अलीकडे हिमालय आहे. तिथे सगळे पांडव आणि तमालनील श्रीकृष्णाचे प्रस्थान झाले होते. तेथे जाण्यासाठी मार्ग नाही मार्गामध्ये खूप मोठे शत्रू पसरलेले आहेत तेही थंड असल्याने पर्वतासारखे भासतात. त्याच्या अगदी अलीकडे शेवटी बद्रिकाश्रम बद्रीनारायण आहे. तिथे महातापसी, निर्वाण, देहत्यागासाठी जातात. त्याच्या अलीकडे बद्रिकेदार आहे, लहान-थोर लोक तिथेजातात. असा हा मेरू पर्वताचा विस्तार आहे.
या मेरूपर्वताच्या पठारावर तीन शिखरे वाकड्या रेषेत आहेत. तिथे ब्रह्मा, विष्णू, महेश परिवारासह राहतात. ब्रह्म्श्रुंग हा पर्वताचा आहे, विश्नुश्रुंग हा पाचूचा आहे. शिवश्रुंग हा स्फटिकाचा आहे. त्याचेच नाव कैलास असे आहे. त्याच्याखाली इंद्राचे अमरावती हे स्थान आहे. तिथे गण,गंधर्व, लोकपाल तेहतीस कोटी देव राहतात. चौदा लोक, सुवर्णाचा डोंगर तिथे आहे. कामधेनूची खिल्लारे कल्पतरूची बने, अमृताची सरोवरे तेथे ठायी ठायी आहेत. तिथे चिंतामणी, हिरे,परीस यांच्या खाणी, लखलखीत सुवर्णमय धरणी आहे. तिथे नवरत्नांच्या पाषाण शिळा, रमणीय तेज आहे. तिथे आनंदमय वातावरण आहे. तेथे अमृताचे भोजन, दिव्य गंधाची दिव्य सुमने, अष्टनायिका, गंधर्व गायन निरंतर चालू असते. तिथे तारुण्य कधीही कमी होत नाही रोग व्याधी नसतात. वृद्धापकाळ आणि मरण येत नाही. तिथे एकाहून एक सुंदर, एकाहून एक चतुर, धीर उदार आणि शूर असे दिसते. ज्योतीरूप दिव्यदेह, विद्युल्लतेसारखे स्वरूप, असीम यशकिर्ती प्रताप दिसतात. असे हे स्वर्गभुवन आहे तिथे सर्व देवांची वस्ती आहे त्या स्थळाचा महिमा काय सांगावा! सांगावे तितके थोडे आहे.
या ठिकाणी ज्या देवाचे भजन करावे त्या देवलोकी आपल्याला तिथे राहायला मिळते. हे स्वलोकता असे म्हणतात. या लोकांमध्ये राहायला मिळणे म्हणजे स्वलोकता. त्याच्या समीप राहायला मिळते म्हणजे समीपता आणि तेच स्वरूप प्राप्त होतं त्याला स्वरूपता तिसरी मुक्ती असं म्हणतात. देहाने देवस्वरूप झाला. श्रीवत्स का उत्सव लक्ष्मीही स्वरूपतेचे लक्षण पाहते. ज्याचा पुण्याचा साठा असतो तो ते उपभोगतात. पुण्याचा साठा सरताच खाली ढकलून देतात. मग आपण देव असलो तरी पहिल्यासारखे होऊन जातो. म्हणून तिन्ही मुक्ती नाशवंत आहेत. सायुज्यमुक्ती हीच शाश्वत आहे. तिचे मी निरूपण करतो ते सावधानपणे ऐकावे. कल्पांचा अंत होईल तेव्हा ब्रम्हांड नाहीसे होईल, पर्वतासहित सर्व क्षितीज जळेल. तेव्हा सर्व देव नाहीसे होतील तर मुक्ती कशी मिळणार? तेव्हा निर्गुण परमात्मा हा निश्चळ आहे. निर्गुणभक्ति ही अचळ आहे. तीच सायुज्य मुक्ती. सायुज्यता म्हणजे स्वरूपता. ती एकमेव आहे असे जाणावे. सगुण भक्ती नाहीशी होणारी आहे. निर्गुण भक्ती अढळ आहे. हे सर्व ज्ञान सद्गुरु केल्यासच प्राप्त होते.
इतिश्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे मुक्तीचतुष्टयनाम चतुर्थ दशक समाप्त.
– पद्माकर देशपांडे
(निरूपणकार पत्रकार / लेखक)
मोबा. 9420695127