दशक ३, समास २ जन्म दुःख निवारण
त्वचा नसलेला गर्भ खवळतो तेव्हा मातेला डोहाळे लागतात. कटू आणि तीक्ष्ण रसांमुळे बालकाचे सर्वांग पोळते. चामड्याचे हे पोटले बांधलेले असते तिथेच विष्ठा, आतडी असतात तेथूनच नाभीपासून नाळ निघत असते. विष्ठा मूत्र वांती नाकातोंडातून जंत निघतात. त्यामुळे जीव कासावीस होतो. अशा प्रकारच्या काराग्रहात अत्यंत अडचणीच्या जागी जीव अडकतो. तेथे तो देवा,चक्रपाणी आता याच्यातून सोडव अशी याचना करतो. देवा मला यातून सोडवा म्हणजे मी काहीतरी स्वहित साधेल, हा गर्भवास चुकवायचा आहे. मला पुन्हा यायचं नाही. असं म्हणून तो प्रतिज्ञा करतो तोच जन्माची वेळ पुढे येते.
माता प्रसुतीच्या वेळी आक्रंदन करू लागते. नाका तोंडाजवळ मास असते त्यामुळे मस्तकाद्वारे श्वास घेण्याचा तो प्रयत्न करतो पण तेही पूर्णपणे झाकलेले असते. जन्माच्या वेळेस मस्तकाचे द्वार झाकलेले असल्याने चित्त कासावीस होते. प्राणी तळमळू लागतो. श्वास कोंडला जातो. त्यामुळे प्राणी त्रासतो. त्याला काही मार्ग दिसत नाही तो कासावीस होतो. खूप त्रास व्हायला लागतो देह आडवा होतो. लोक म्हणतात आडवा आला आता कापा… मग ते हात पाय काढतात हातपाय ते कापतात तोंड नाक पोट यांना टाके घालतात कधीकधी त्या झटापटीत बालक प्राण सोडून देतं. माता मृत बालकास जन्म देते. कधीकधी बालक मरण पावतो आणि मातेचेही प्राण घेतो.
गर्भवस्थेमध्ये असे दारूण दुःख भोगावं लागतं. भाग्यामुळे बाहेर येण्याचा मार्ग सापडला तरी कंठ आणि खांदा यापाशी कधीकधी अडकतो मग त्याला कष्टाने ओढून काढावे लागते, त्या वेळी सुद्धा कधी कधी प्राण जातात. बालकाचे प्राण गेले की त्याला पुन्हा विस्मरण होते, पूर्वीचे स्मरण राहत नाही. गर्भामध्ये असताना सोहम सोहम म्हणतो बाहेर पडल्यावर मी कोण? कोहम असा प्रश्न विचारतो. यातून कसाबसा बाहेर आला की, गर्भवासाचे कष्ट विसरले जातात. मन सुन्न होते. काय झाले काही आठवत नाही. अज्ञानामुळे भ्रांत निर्माण होते आणि तेच सुख असे वाटायला लागते. देहाचे विकार, सुखदुःख, माया यातच तो अडकतो. गर्भवस्थेमध्ये असे दुःख प्राणीमात्रांना होते, म्हणून परमेश्वराला शरण जावे. जो भगवंताचा भक्त झाला तो जन्मापासून मुक्त झाला. ज्ञानबळामुळे सर्व काळासाठी विरक्त झाला. अशाप्रकारे गर्भवस्थेमध्ये असलेली संकटे मी यथामती सांगितली. श्रोत्यांनी सावधान होऊन पुढे लक्ष द्यावे.
इतीश्री दासबोधे गुरुशिष्यसंवादे जन्म दुःख निरूपण नाम प्रथम समास समाप्त.
– पद्माकर देशपांडे
(निरूपणकार पत्रकार / लेखक)
मोबा. 9420695127