दशक २, समास ९ विरक्त वर्णन
विरक्ताने प्रेमळस्थिती, उदासस्थिती, योगस्थिती, ध्यानस्थिती, विदेहस्थिती, सहजस्थिती सर्व जाणावे. ध्वनी, लक्ष, मुद्रा, आसने, मंत्र यंत्र विधि विधाने सर्वांचा अनुभव घ्यावा. विरक्ताणे जगन्मित्र असावे, रक्ताने स्वतंत्र असावे, विरक्ताने विचित्र बहुगुणी असावे. विरक्ताने हरिभक्त असावे, विरक्ताने अलिप्त राहून नित्यमुक्त असावे. विरक्ताने शास्त्रांचा धांडोळा घ्यावा, विविध मतांचे खंडन करावे, विरक्ताने मुमुक्शुना शुद्ध मार्ग सांगावा. त्यांच्या मनातील संशय नाहीसा करावा,विरक्ताने विश्वातील सर्वांना आपले म्हणावे. विरक्ताने निन्दकाना वंदावे, विरक्ताने साधकांना बोध द्यावा, विरक्ताने मुमुक्षुना निरुपण करून मुक्तीच्या वाटेवर न्यावे. विरक्ताने उत्तम गुण घ्यावे, अवगुण त्यागावे, विवेकाच्या बळाने वाईट गोष्टी नष्ट कराव्यात. अशी ही उत्तम लक्षणे आहेत ती एकाग्र मनाने ऐकावी. याचा विरक्त पुरूषाने अव्हेर करू नये. इतके मी सांगितले आहे त्यातलं मानवेल तितकं घ्यावं. जास्त बोललो म्हणून श्रोत्यांनी उदास होऊ नये. परंतु लक्षण न घेता अवलक्षण घेतले तर तो बाष्कळपणा ठरेल आणि त्याला पढतमूर्खपणा येईल. त्या पढतमूर्खाची लक्षणे पुढील समासात सांगतो ती सावधपणे ऐका.
इतिश्री दासबोधे गुरुशिष्यसंवादे विरक्त लक्षण नाम समास नवंम समाप्त.
दशक दुसरे समास दहावा
मागे मी मूर्खांच्या अंगामध्ये चातुर्य निर्माण होईल अशा तऱ्हेची लक्षणे सांगितली. आता शहाणे असूनही मूर्खासारखे वागतात त्याला पढतमूर्ख असे म्हणतात त्याची लक्षणे सांगत आहे. श्रोत्यांनी दुःख मानु नये कारण ती सोडून दिली असता सुख प्राप्त होते. बहुश्रुत आणि व्युत्पन्न प्रांजळ असे ब्रह्मज्ञान बोलणारा स्वतः मात्र अभिमान आणि वाईट इच्छा धरतो तो पढतमूर्ख होय. स्वच्छंद वर्तन करण्यास सांगतो, सगुणभक्तिला विरोध करतो, स्वधर्म आणि साधनाची निंदा करतो तो एक पढतमूर्ख. स्वतःला शहाणा समजून सर्वांना अज्ञानी समजतो, लोकांमधील दोष पाहतो तो एक पढतमूर्ख. शिष्याला आचरण करता येणार नाही असे आदेश देतो संकटात पाडतो, ज्याच्या शब्दामुळे मन दुखावले जाते तो एक पढतमूर्ख. रजोगुण, तमोगुण, कपटी अन कुटिल अंतःकरणाचा, वैभव पाहून स्तुती करणारा तो एक पढतमूर्ख. संपूर्ण ग्रंथ पाहिल्याशिवाय उगाचच नावे ठेवतो, गुण विचारता अवगुण पाहतो तो एक पढतमूर्ख. लक्षणे ऐकून कंटाळतो, मत्सर करून विरोधी वर्तन करतो, नितीन न्यायाच्या विरोधात वागतो तो एक पढतमूर्ख. जाणीवपूर्वक हट्टाला पेटतो, आलेला क्रोध आवरता येत नाही, कृती आणि शब्द याच्याबद्दल अंतर बाळगतो तो एक पढतमूर्ख. अधिकार नसताना वकृत्व करतो, ज्याचे वचन कठोर असते तो एक पढतमूर्ख. एखादा बहुश्रुत श्रोता वक्त्याला प्रश्न विचारून कमीपणा आणतो, त्याच्याशी वाचाळपणा करतो तो एक पढतमूर्ख. दुसऱ्यांना दोष देतो तेच दोष त्याच्यात असतात हे ज्याला कळत नाही तो एक पढतमूर्ख. मूर्खांची लक्षणे आणखीन बरीच आहेत की पुढील भागात पाहूया.
– पद्माकर देशपांडे
(निरूपणकार पत्रकार / लेखक)
मोबा. 9420695127