जय जय रघुवीर समर्थ. माया आणि ब्रह्म यांच्या संदर्भामध्ये श्रोत्यांनी शंका उपस्थित केली आहे त्याबाबत समर्थ सांगताहेत. ब्रह्म हे अकर्ता आहे तर माया कशी निर्माण झाली? असा श्रोत्याचा प्रश्न आहे. या शंकेबाबत लोकांचे वेगवेगळे अनुभव आहेत. ते यथाक्रम सांगतो. समर्थ ते म्हणतात देवाने माया केली म्हणून ती विस्तारली. देवाला इच्छा झाली नसती तर माया कशी निर्माण झाली असती? एक म्हणतात, देव निर्गुण आहे, मग इच्छा कोण करतं? माया मिथ्या.. ती निर्माण झालीच नाही.
एक म्हणतात, प्रत्यक्ष दिसतं त्याला नाही कसं काय म्हणता? माया अनादि आहे. ती ईश्वराची शक्ती आहे. एक म्हणतात खर दिसतं ते ज्ञान असल्यामुळे नाहीसं कसं होतं? खऱ्यासारखी दिसते पण ती खोटी आहे. एक म्हणतात ती खोटी आहे तर मग साधन कशासाठी करायचं?देवाने भक्ती साधन माया त्यागासाठी सांगितलं आहे. ते कशासाठी करायचं? अज्ञानरूपी सन्निपात ज्वरामुळे मायेचे भय वाटते म्हणून साधनरुपी औषध घेतले पाहिजे. दृश्य मिथ्या आहेच. नंत साधने सांगितली जातात, नाना मतांमुळे मन भांबावलेल आहे तरी माया त्यागली जात नाही, तर तिला खोटी का म्हणायचं? योगामध्ये, वेदशास्त्र, पुराणांमध्ये माया खोटी असे सांगितले आहे. माया खोटी असे म्हटले म्हणून गेली असा कधी ऐकलं नाही. उलट ती वाढली असे दिसते. यावर समर्थ म्हणतात, ज्याला अंतर्ज्ञान नाही ज्यांनी सज्जन ओळखता येत नाहीत, त्याला माया हीच खरी वाटते. ज्याचा जसा निश्चय असेल तस त्याला दिसतं. जे असत तेच आरशात दिसतं. तशीच माया आहे.
एक म्हणतात माया कुठे आहे? सर्व ब्रह्मच आहे. घट्ट किंवा पातळ असलं तारो दूध ते एकच. घट्ट आणि पातळ हे स्वरूप आहे, मूळ रूप नव्हे. एक म्हणतात हे सगळं ब्रह्म आहे हे त्याला समजत नाही, त्याच्या अंतरीचा भ्रम गेलाच नाही. एक म्हणतात देव एकच आहे तिथे इतर कसे आणले? सर्व ब्रह्म हे अपूर्व असे म्हणून त्याला आश्चर्य वाटतं. काही म्हणतात एकच खर आहे बाकी दुसरे काही नाही. सर्व ब्रह्म सहजच निर्माण झालेले आहे. एकंदर सगळ खोट आहे, फक्त ब्रह्मच खरे असं शास्त्राचा आधार घेऊन काही सांगतात. अलंकार आणि सुवर्ण याच्यामध्ये वेगळेपणा नाही फक्त ते आटवले जाते असं काही जण म्हणतात. काय लागू पडेल त्याचं वर्णन करण्यासाठी दुसरी गोष्ट सांगतात मात्र ती हीन उपमा आहे. वस्तू आणि उपमा यात साम्य दिसत नाही.
सुवर्णाचा आपण जर विचार केला तर अलंकार देखील सोनच आहे. सोनं हे दिसणारी गोष्ट आहे. सोन्याचा दृष्टांत आहे तो इथे देता येत नाही, पूर्णाला अपूर्णाचा दृष्टांत कसा लागू पडेल? त्यापेक्षा समुद्र आणि त्याच्या लाटा या वेगळ्या नाहीत. उत्तम मध्यम कनिष्ठ ह्या एका दृष्टांतामध्ये स्पष्ट दिसते.मात्र दृष्टांतामुळे संदेह वाढतो. समुद्र कोणता आणि लाटा कोणत्या? अचलाची बरोबरी चल करू शकत नाही. माया आणि ब्रह्म यांची बरोबरी नाही. माया ही कल्पना आहे, ती लोकांना नाना भास दाखवते. नाही तर सगळ ब्रह्मच आहे. असा वाद एकमेकांमध्ये लागला आणि शंका निर्माण झाली. ते तुम्ही सावध होऊन पुढे ऐका. माया मिथ्या आहे समजलं तरी ती ब्रह्म कशी झाली? ती निर्गुणाने केली म्हटले तरी ते तर पूर्णच मिथ्या. मिथ्या या शब्दांमध्ये काहीच नाही तिथे कोणी काय केले? निर्गुण काही करेल हे अघटीत आहे. कर्ता अरूप आहे, असे सांगितले तर तेही मिथ्या रूप वाटते. अशी शंका श्रोत्यांनी व्यक्त केली. त्याचेही आता आपण निरसन करू या. असं समर्थ सांगतात. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवाद सूक्ष्म आशंका नाम समास द्वितीय समाप्त.
जय जय रघुवीर समर्थ.
पद्माकर देशपांडे
(निरूपणकार पत्रकार / लेखक)
मोबा. 9420695127