जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरु भजनासंदर्भात अधिक माहिती देताना समर्थ गुरुगीता अभ्यासण्याचा उपदेश करतात. गुरु गीतेमध्ये पार्वती सदाशिवाला गुरु मानून त्याला शरण जाते असे वर्णन आहे. त्याचे साधकाने मनन करावे म्हणजे ज्ञानाचा मार्ग सापडेल. दासबोधामध्ये वर्णन केलेले अद्वैत हे प्राकृत मानू नये. यामध्ये वेदांताचा अर्थ स्पष्ट करण्यात आलेला आहे.
प्राकृतामध्ये देखील वेदांत कळू शकतो, सगळी शास्त्रे पाहायला मिळू शकतात आणि अंतर्यामी समाधान मिळू शकते. हा ग्रंथ म्हणजे ज्ञानाचा उपाय असून त्याला प्राकृत म्हणून हिणवू नये. माकडाला नारळाचे महत्व समजत नाही त्याप्रमाणे मुर्खाला हे कळू शकत नाही. आता हे बोलणे अधिकाराप्रमाणे घ्यावे. बंद शिंपल्यातला मोती प्रत्यक्ष पाहिला नसल्याने तो कमी प्रतीचा आहे असे म्हणू नये. जिथे वेद नेती नेती म्हणतात तिथे भाषा व्युपत्ती चालत नाही. असे परब्रम्ह आदिअंती अनिर्वाच्य आहे. इतिश्री दासबोधे गुरुशिष्यसंवादे देहान्त निरूपण नाम समास दशम समाप्त.
मायोद्भव नाम दशक आठवे देवदर्शन नाम समास पहिला
श्रीराम. श्रोत्यांनी सावध व्हावे. गुरु-शिष्यांच्या संवादातून बालबोधपणे केवलज्ञान अत्यंत सुलभ करून सांगत आहे. नाना शास्त्रांचा अभ्यास करण्यासाठी आयुष्य पुरत नाही. मनामध्ये संशयाची व्यथा वाढू लागते, नाना तीर्थ सृष्टीमध्ये आहेत, अनेक सुगम आहेत, काही दुर्गम आहेत, काही दुष्कर आहेत. ती पुण्यदायक आहेत, मात्र सर्व तीर्थे केली, जन्मभर फिरत राहिला तरी त्याला आयुष्य पुरणार नाही. नाना तीर्थे, नाना दाने, नाना योग, नाना साधने हे सगळं देवासाठी करीत राहिला. देव पावावा यासाठी खूप श्रम केले त्यामुळे देव मिळेल असं वाटतं. भगवंत मिळण्यासाठी नाना पंथ, नाना मते अशा या देवाचे स्वरूप कसं आहे? सृष्टीमध्ये खूप देव आहेत. त्यांची गणना करता येणार नाही.
एकच देव कुठेही दिसत नाही. खूप विविध प्रकारची उपासना केली जाते, लोकांची इच्छा असते ती पूर्ण होते आणि मग मनामध्ये तेच तो धरून बसतो. अनेक देव आणि भक्त इच्छेमुळे आसक्त झाले. अनेक ऋषी आहेत त्यांची अनेक मते वेगवेगळी आहेत. त्यातून एक निवडता येत नाही. निश्चय होत नाही. शास्त्रांमध्ये भांडण लागते. कारण एकनिष्ठता नाही. अनेक शास्त्रांमध्ये देखील मतभेद आहेत अनेक मतांना विरोध आहे. अशा प्रकारचा विवाद करीत पुष्कळ जण गेले. हजारांमध्ये एखाद्याला देव कसा हे समजते. पण त्या देवाचं कौतुक त्याच्या लक्षात येत नाही. लक्षात येत नाही कारण त्याला अहंकार आडवा येतो. अहंकारामुळे पुन्हा देव दूर राहतो. असो ज्या देवासाठी विविध योग केले तो देव तू कसा दृष्टीस पडेल? देव कोणाला म्हणावं? त्याला कसं जाणावं? ते आता मी सांगतो.
ज्याने चराचर सृष्टी निर्माण केली, त्याच्यामुळे सर्व व्यापार चालतात, तो निरंतर सर्व करणारा आहे, त्याने मेघमाला केल्या, चंद्रबिंबामध्ये शितल चांदणे निर्माण केळे, त्याने रवी मंडळाला तेज दिले, त्याने सागराला मर्यादा घालून दिली. त्याने शेषनागाची स्थापना केली. ज्याच्यामुळे तारा ग्रहतारे अंतरिक्ष आहे. चारी खाणी चारी वाणी ८४ लक्ष जीवयोनी, तिन्ही लोक निर्मिले त्याचे नाव देव. ब्रम्हा विष्णू आणि शंकर हे ज्याचे अवतार आहेत, तोच हा देव आहे. देव्हाऱ्यातील देवाची मूर्ती म्हणजे देव नाही. देवाने सर्व ब्रह्मांड मांडले आहे. ठायी ठायी देव असतात, त्यांनी पृथ्वी निर्माण केली नाही, चंद्र तारा मेघ त्यांनी निर्माण केलेले नव्हे. सर्व कर्ता तो देव तो निराकार आहे. त्याची कला कौशल्य ब्रह्मादिक देखील जाणू शकत नाहीत. इथे शंका निर्माण झाली पुढल्या समाजामध्ये दूर झाली पाहिजे, आता श्रोत्यांनी लक्ष द्यावे. याबाबत अधिक विस्तार ऐका पुढील भागात.
जय जय रघुवीर समर्थ.
– पद्माकर देशपांडे
(निरूपणकार पत्रकार / लेखक)
मोबा. 9420695127