जय जय रघुवीर समर्थ. कल्पनेमुळे अनंतसृष्टी निर्माण झाल्या आहेत. त्या सृष्टीच्या गोष्टी खऱ्या कशा असतील? कल्पनेने देव केला, तिथे दृढ भावना निर्माण झाली. देवाला अपाय झाला त्यामुळे भक्ताला दुःख झाले. दगडाचा देव केला तो एके दिवशी भंगला, त्यामुळे भक्त दुखावला आणि रडू लागला, आक्रंदन करू लागला. देव घरातून हरवला, देव चोरीला गेला, दुराचारी लोकांनी फोडला, भ्रष्ट केला. एक देव पाण्यामध्ये टाकला, पायाखाली चिरडला. काय सांगू तीर्थाचा महिमा धुळीस मिळवला. काय झाले कळत नाही. सोनाराने देव घडवला, ओतर्याने देव घडवला, पाथरवटाने पाषाणाचा देव घडवला.
नर्मदा-गंडकी नदीच्या काठी लक्षावधी देव पडलेत त्यांची संख्या कोण मोजणार? असंख्य गोटे! चाक्रर्तीर्थावर चक्रांकित असंख्य देव आहेत. त्यामुळे एक देव आहे असा निश्चय होत नाही. शेंदूर फासलेले दगड, तांब्याचे नाणे, देव्हाऱ्यामध्ये स्फटिक पूजले जातात. असे देव कोण जाणे खरे आहेत की खोटे! रेशमाचा देव केला तो तुटून गेला, आता नवीन मातीच्या देवाचा नेम धरला. आमचा देव खरा, आम्हाला तो संकटात पावतो. आमचे नेहमी मनोरथ पूर्ण करतो. आता याचे सत्व गेले जे भाग्यात होते ते झाले. ईश्वरकडून मिळणार होते ते आता नाही मिळणार. धातू, दगड, माती, चित्रलेप,लाकूड तिथे देव कसला रे मुर्खा? तुला भ्रांती झालेली आहे. ही आपली कल्पना आहे आपण ठरवू तशी त्याची फळे मिळतात. पण देवाच्या खुणा वेगळ्याच आहेत, म्हणून मायेचे भ्रमण आहे.
सृष्टी ही खोटी आहे हे कोट्यवधी वेळा मी सांगेल. वेद शास्त्र पुराणे हेच सांगत आहेत. साधुसंत, महानुभाव यांचा असाच अनुभव आहे. देव हा पंचमहाभूतांच्या पलीकडील आहे आणि सृष्टी खोटी आहे. सृष्टीपूर्वी सृष्टी होती, तिचा संहार झाला तेव्हा आणि नन्तर देखील आदि अंती देव आहेच, असा सर्वांचा निश्चय आहे. त्याबाबत कोणताही संशय नाही. याबाबत कोणताही विरोध किंवा त्याच संकल्प करायचा नाही. एका कल्पनेमुळे अष्ट सृष्टी निर्माण झाल्या. या सृष्टीची गोष्ट सावधपणे ऐका, एका कल्पनेची सृष्टी, दुसरी शाब्दिक सृष्टी, तिसरी प्रत्यक्ष सृष्टी, हे सगळे जाणतात. चौथी चित्रलेप श्रुष्टी, पाचवी स्वप्नसृष्टी, सहावी गन्धर्व सृष्टी, सातवी ज्वर श्रुष्टी, आठवी दृष्टीबंधन सृष्टी. अशा आठ प्रकारच्या सृष्टी आहेत. यामध्ये श्रेष्ठ कोणती आहे? सत्य कोणती आहे? म्हणून सृष्टी ही नाशवंत आहे हे संत महंत जाणतात.
खऱ्या देवाचा निश्चय असला तर सगुणाची भक्ती करावी. सगुणाच्या आधारे निर्गुण ईश्वर मिळवावा. संतांच्या संगतीने सारासार विचार करून हे करावे. संतांच्या संगतीने हे कळेल अन्यथा चित्त विचलित होईल. संशय निर्माण होईल. तेव्हा शिष्यांनी विचारले, सृष्टी मिथ्या आहे हे कळले. पण हे सर्व खोटे आहे तरी का दिसते? दृश्य प्रत्यक्ष दिसते म्हणून सत्य वाटते. याला काय करायचे ते स्वामिनी सांगावे. याचे उत्तर पुढच्या समासात देत आहे ते श्रोत्यांनी श्रवण केले पाहिजे. सृष्टी खोटी आहे हे जाणून देखील सगुण पूजा करावी अशी अनुभवाची खुण अनुभवी जाणतात. इतिश्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सृष्टीकथन नाम समास षष्ठ. जय जय रघुवीर समर्थ.
पद्माकर देशपांडे
(निरूपणकार पत्रकार / लेखक)
मोबा. 9420695127