दशक तिसरा समाज दहावा वैराग्य निरूपण
ज्याला त्रास व्हावा असे वाटते त्याने विषयांचे चिंतन करीत जावे. विषय न मिळताच जीवाची तगमग होते. आनंदघन रामाला सोडून ज्याच्या मनामध्ये विषय चिंतन चालते, त्या विषयासाक्तास समाधान कसे मिळणार? त्याला सुख असावे असे वाटते त्याने रघुनाथाचे भजन करण्यास लागावे, दुःखाचे मूळ असलेले स्वजन त्यागावे. जेथे वासना उफाळून येते तेथे अपाय आणि दुःख निर्माण होतात म्हणून विषयवासना सोडणारा तो एकमेव सुखी असतो.
विषयापासून निर्माण होणारे सुख म्हणजे परमदुःख होय. आधी ते गोड वाटले तरी नंतर शोक निश्चित आहे. गळ गीळला असता माशाला सुख वाटते, पण ओढून घेतले असता घसा फाटतो. तसेच चारा पाहून हरीण सापळ्यात सापडतो, त्याप्रमाणे विषयसुखाची गोडी गोड वाटली तरी वाईट आहे, म्हणून रघुनाथाची आवड धरावी. हे ऐकून भाविकांनी विचारले स्वामीजी, असा उपाय सांगा की ज्याच्यामुळे आमचा यमलोक चुकेल. देवाचे वास्तव्य कोठे असते? तो आम्हाला कसा भेटेल? दुःख रुपी संसार कसा दूर होईल? हे आम्हाला सांगावे. प्रत्यक्ष भगवंत प्राप्ती होऊन अवनती टळावी असा उपाय कृपामूर्ति स्वामीजी मज दिनावर करावा. यावर स्वामी म्हणतात एकचित्ताने भगवत भजन करावे त्यामुळे समाधान होईल. भगवत भजन कसे करावे? मन कुठे ठेवावे? भगवत भजनाचे लक्षण मला सांगावे असं उदास चेहऱ्याने स्वामींची पावले धरून सद्गदित कंठाने नेत्रांतून अश्रुपात होत असताना भक्ताने विचारले. शिष्याची अनन्यभक्ती होऊन सद्गुरु विरघळले. आता पुढील समासात स्वानंदप्राप्तिचा उपाय स्वामी सांगतील.
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे वैराग्य निरूपण नाम समास दशम समाप्त नवविधाभक्ति नाम चतुर्थ दशक
गणनाथाचा जयजयकार असो. तू विद्या वैभवामध्ये समर्थ आहेस,अध्यात्म विद्येचा परमार्थ आहेस, तू मला बोलते कर. वेदांची जननी असलेला शारदेस नमन. तुझ्यामुळे सर्व सिद्धी प्राप्त होतात, मनामध्ये स्फूर्ती निर्माण होते. आता सद्गुरुंचे स्मरण करूया. तो श्रेष्ठाहून श्रेष्ठ ब्रम्हरूप आहे. त्याच्यामुळे ज्ञान विचार समजू लागतो. श्रोत्यांनी विचारले आहे, भगवत भजन कसे करावे? म्हणून ग्रंथांमध्ये मी निरूपण करीत आहे. श्रोत्यांनी सावध होऊन ऐकावे. नवविधा भक्ती कशी करावी याबाबत शास्त्रामध्ये जे सांगितले आहे ते ऐकून पावन व्हावे. आता मी नवविधा भजनाची माहिती देत आहे ती श्रोत्यांनी लक्ष देऊन ऐकावी. हरीकथा, पुराण, श्रवण, नाना अध्यात्म निरूपण ही प्रथम भक्ती असून ते ऐकत जावे.
कर्ममार्ग, उपासना मार्ग, ज्ञानमार्ग, सिद्धांत मार्ग, योग मार्ग, वैराग्यमार्ग याबाबतची माहिती, नाना व्रतांच्या महिमा, नाना तीर्थांचा महिमा ऐकत जावा. नाना महात्मे, नाना स्थाने, नाना मंत्र, नाना साधने, नाना पुरश्चरणे ऐकत जावे. दुग्धाहारी, नीराहारी, फळाहारी, पर्णाहारी, तृणाहरी नानाहारी कसे असतात ते ऐकावे. उष्णवास, जलवास शीतवास, अरण्यवास, भूगर्भ आणि आकाशवास कसा असतो ते ऐकावे. जपितपि, तामस योगी, नाना निग्रह, हटयोगी, शक्तीचे उपासक, अघोरयोगी कसे असतात ते ऐकावे. नाना मुद्रा, नाना आसने, नाना चिन्हे, बिंदूत्रिकोण इत्यादी चिन्हे, शरीरातील विविध चक्रे, ज्ञाने तत्त्वज्ञाने कशी असतात ते ऐकावे. नाना पिंडदान, तत्वज्ञान ऐकावे. नाना भूगोलाची रचना, नाना सृष्टीची रचना कशी असते ती ऐकावी. चंद्रसूर्य, तारा मंडळ, ग्रह मंडळ, मेघ मंडळ, एकवीस स्वर्ग, सप्तपाताळे कशी असतात ते ऐकावे.
पद्माकर देशपांडे
(निरूपणकार पत्रकार / लेखक)
मोबा. 9420695127