दशक तिसरे, समास आठवा आधिदैविक ताप
मागच्या समासात अध्यात्मिक व आधिभौतिक तापाचे वर्णन केले. आता आधिदैविक तापाची माहिती सावधपणे ऐका. शुभ-अशुभ कर्मामुळे लोकांना देहांताच्या समयी यमयातना भोगाव्या लागतात. स्वर्ग-नरक नाना भोग भोगावे लागतात त्याला आधिदैविक असे म्हणतात. नाना दोष, नाना पातके मदांधपणे अविवेक केला त्यामुळे दुःखदायक यमयातना भोगाव्या लागतात. शारीरिक बळ, पैशाची मस्ती, मनुष्यबळ, राजबळ, नाना सामर्थ्याच्या बळामुळे चुकीचे कृत्य केले जाते.
नीती तत्व सोडून करू नये तेच केले जाते त्यामुळे यमयातना भोगताना जीव जातो. डोळे झाकून स्वार्थ बुद्धीने नाना अभिलाषा, कुबुद्धी यांच्या साह्याने जमिनी, पैसा, स्त्रिया, पदार्थ हडप केले जातात. उन्मत्तपणाने माजून जिवाचा, कुटुंबाचा घात केला जातो. चुकीचे कृत्य केले जाते म्हणून यमयातना भोगाव्या लागतात. मर्यादा सोडून वर्तन होते. ग्राम अधिपती, ग्रामसेवक, देशाचे नेतृत्व करणारा अधिपती, यांनी नितीन न्याय सोडला तर देशाधिपतीला राजा शिक्षा करतो, राजाला देव शिक्षा करतो राजाने निती न्याय न केल्यास यमयातना भोगाव्या लागतात. राजा पापी झाला, त्याने स्वार्थ पाहिला म्हणून त्याला नरक भोगावा लागतो.
राजाने राजनीती सोडली तर त्याला यम शिक्षा देतो. यमाने नीतिनियम सोडले तर देवगण त्याला शिक्षा करतात. अशी मर्यादा देवाने घालून दिली आहे, म्हणून नीतीने वागावे. निती-न्याय सोडला तर यातना भोगाव्या लागतात. देवाने यमाला प्रेरणा दिली म्हणून आधिदैविक असे त्याला म्हणतात. यमयातना उदंड आहेत. त्याचे नाना प्रकार शास्त्रात सांगितले आहेत. तो भोग कदापि चुकू शकत नाही त्याला आधिदैविक असे म्हणतात. शास्त्रामध्ये यमयातनाचे वर्णन केले आहे. यामध्ये शरीरास नाना प्रकारे त्रास दिला जातो. स्वर्गामध्ये असलेल्या प्रेतांत नाना शरीरे असतात. त्यांना भोग भोगावे लागतात. पुण्य करणाऱ्यास विलास तर पाप करणाऱ्यास यातना भोगाव्या लागतात. असे शास्त्रात सांगितले आहे. त्यावर अविश्वास बाळगू नये. वेदाज्ञेने चालत नाहीत, हरिभक्ती करीत नाहीत त्यांना यमयातना भोगाव्या लागतात त्याला आधिदैविक असे म्हणतात. अक्षोभ नावाचा नरक आहे, त्यामध्ये जुनाट किडे रवरव करत असतात. हातपाय बांधून त्यात टाकले जाते. त्यास आधिदैविक म्हणतात.
कुंभीपाक नावाचा एक नरक आहे त्यामध्ये कुंभाप्रमाणे एक कुंड असते. त्या कुंडाचे तोंड लहान असते त्यामध्ये दुर्गंधी उकाडा सहन करावा लागतो त्याला आधिदैविक असे म्हणतात. जळत्या स्तंभावर चटके देणे, तापलेल्या सळईने डाग देणे, सांडशी लावणे याचे नाव अधिदैविक ताप. यमदंडाचा उदंड मार सहन करावा लागतो, पापी नराला भोगावे लागणारे आहे भोग म्हणजेच आधिदैविक होय. पृथ्वीवर नाना प्रकारचे मार सहन करावे लागतात त्यापेक्षा यमयातना कठीण आहेत. मेल्यावर देखील उसंत मिळत नाही त्यास अधिदैविक म्हणतात. चार दिशांना चार जण ओढतात. कोणी धक्का मारून पाडतात, कोणी ताणून मारत ओढून नेतात त्याला अधिदैविक असे म्हणतात. उठता येत नाही, बसता येत नाही, रडता येत नाही, पडता येत नाही यातनेवर यातना भोगाव्या लागतात त्याला अधिदैविक म्हणतात. आक्रंदन करतो, रडतो, शोक करतो, घाबरतो, बारीक होऊन झिजला, अस्थिपंजर झाला याचे नाव अधिदैविक ताप. कर्कश्य वचने, कर्कश्य मार, यातनेचे नाना प्रकार. दोषी नरांना भोगावे लागतात त्याचे नाव अधिदैविक ताप. मागे राजदंडाची माहिती दिली त्यापेक्षा यमदंड कठीण आहे. तेथील यातना फार मोठ्या प्रचंड असतात. अध्यात्मिक, अधिभौतिक आणि आधिदैविक यांचे वर्णन थोडक्यात माहितीसाठी केले आहे.
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे आधिदैविक ताप नाम समास अष्टम समाप्त.
-पद्माकर देशपांडे
(निरूपणकार पत्रकार / लेखक)
मोबा. 9420695127