आपल्या मनातील भावाप्रमाणे देव ध्यानामध्ये आठवावा त्याप्रमाणे हे सद्गुरु आपले स्तवन करतो. सद्गुरुराजांचा जय जय कार असो! आपण विश्वंभर, विश्वबीज, परमपुरुष, मोक्षध्वज, दीनबंधू आहात. सूर्यप्रकाशामुळे अंधार पळून जातो त्याप्रमाणे आपल्या अभयहस्तामुळे न आवरण्यासारखी माया देखील ओसरते. सूर्यामुळे अंधार दूर होतो, परंतु रात्र झाल्यावर पुन्हा ब्रम्हांडात काळोखच पसरतो तसे गुरूंचे कार्य नसते. ते अज्ञानाचा नाश करून जन्म-मृत्यूची वारी निवारण करतात. परीसामुळे लोखंडाचे रूपांतर सुवर्णात होते त्याप्रमाणे गुरु कार्य करतो.
एकदा का छोटी नदी गंगेला मिळाली की गंगाच होऊन जाते, मग ती वेगळी करता येत नाही. लहान नदी गंगा झाल्यावर तिला कोणी ओढा म्हणत नाही, त्याप्रमाणे शिष्य गुरुकृपेमुळे स्वामीच होऊन जातो. परीसामुळे लोखंडाचे सुवर्ण झाल्यावर पुन्हा त्याचे लोखंड होत नाही त्याप्रमाणे गुरूच्या अंकित झाल्यावर शिष्य उपदेश करू लागतो. मात्र परीसाद्वारे सुवर्ण निर्माण झाले तरी सुवर्णाद्वारे पुन्हा सुवर्ण करता येत नाही, सद्गुरूने शिष्य तयार केला की तो मात्र दुसरा शिष्य तयार करू शकतो त्यामुळे गुरूला ही उपमा देता येत नाही. सद्गुरुला समुद्राची उपमा द्यावी, तर समुद्र अत्यंत खारट असतो त्यामुळे ते देखील योग्य नाही. गुरूला क्षीरसागराचे उपमा दिली तरी कल्पांती तो नष्ट होईल म्हणून तीही उपमा देता येत नाही. त्याला डोंगराची उपमा दिली तरी डोंगर म्हणजे कठोर पाषाण असतो, सद्गुरु तसा नसतो. तो कोमल हृदयाचा असतो. आकाशाची उपमा त्याला दिली तरी याप्रमाणे तो पोकळ निर्गुण नसतो त्यामुळे तोही दृष्टांत गुरूला देता येत नाही. गुरूला पृथ्वी च उपमा दिली तरी पृथ्वी देखील युगांत झाल्यावर खचते त्यामुळे ही उपमा देखील देता येत नाही.
सद्गुरुला सूर्याची उपमा दिली तरी सूर्याचा प्रकाश मर्यादित असतो तर सद्गुरु मात्र अमर्याद असतो असे शास्त्रे सांगतात. त्यामुळे सद्गुरु पुढे सूर्यही कमीच आहे. त्याला शेषाची उपमा दिली तरी शेष हा केवळ भारवाही आहे त्यामुळे तसंही म्हणता येणार नाही. सद्गुरुला पाण्याची उपमा दिली तर पाणी केव्हा तरी आटेल सद्गुरुरुप कायमस्वरूपी आहे ते कधीही आटणार नाही. सद्गुरुला अमृताची उपमा दिली तरी अमर असलेले देव देखील मरण पावतातच. सद्गुरूकृपा मात्र यथार्थपणे मोक्ष देते. त्यामुळे अमृताची उपमा त्यालादेता येत नाही.
सद्गुरूला कल्पतरू म्हणावे तरी तेही बरोबर होणार नाही कारण कल्पना केली ते कल्पतरू देतो गुरु मात्र कल्पनातीत असे काही देतात. ज्याला काही चिंता असते त्याची चिंता चिंतामणी दूर करतो मात्र मनी चिंता नसली तरी गुरू कृपा करतो, त्यामुळे गुरूला चिंतामणी पण म्हणता येणार नाही. कामधेनु ही इच्छा पूर्ण करते मात्र इच्छा नसेल तर कामधेनूचा काही उपयोग नाही त्यामुळे सद्गुरुला तीही उपमा देता येणार नाही.
सद्गुरूला लक्ष्मीवंत म्हणावे तरी लक्ष्मी नाशवंत असते सद्गुरूच्या दारी तर प्रत्यक्ष मोक्षलक्ष्मी तिष्ठत असते. स्वर्गलोक इंद्र संपत्ती हे देखील काळानुसार नष्ट होतात. मात्र सद्गुरुकृपेची प्राप्ती झाली तर कितीही काळ लोटला तरी ती कृपा कमी होत नाही. हरिहर आणि ब्रम्हा देखील सर्व नष्ट पावतात. फक्त सद्गुरुपद हेच अविनाशी आहे. सद्गुरुला उपमा काय द्यावी? सगळी सृष्टी नाशवंत आहे! येथे पंचमहाभौतिक उठाठेवी चालत नाहीत, म्हणून मला सद्गुरुचे वर्णन करता येत नाही. आता केले हेच माझे वर्णन आहे, हीच अंतरंगातील स्थिती आहे. या अंतर्निष्ठांच्या खुणा अंतर्निष्ठच जाणतात. इती श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सद्गुरु स्तवन नाम समास चतुर्थ समाप्त.
दशक एक समास ५
आता परमार्थाचे अधिष्ठान असलेले, ज्यांच्यामुळे गुप्तज्ञान प्रगट होते अशा सज्जनांना मी वंदन करतो! परम दुर्लभ असलेल्या ब्रह्माचा अलभ्य लाभ संतांमुळे सुलभ होतो. खरेतर वस्तू म्हणजे ब्रह्म तिथेच असते पण पाहील्यावर कोणाला दिसत नाही. नाना साधने, प्रयत्न केले तरी सापडत नाही. येथे मोठमोठे परीक्षक फसले. डोळस देखील अंध झाले, निजवस्तू पाहूनही चुकले. दिवा असूनही दिसत नाही, भरपूर प्रकाश असूनही सापडत नाही, नेत्रांजन घालूनही डोळ्याला दिसत नाही, पौर्णिमेचा पूर्ण चंद्र असला तरी वस्तू दिसत नाही. सूर्य असला तरी दिसू शकत नाही ज्या सूर्याच्या प्रकाशात केसांची टोक, कोळिष्टकाचा धागा देखील दिसतो, नाना सूक्ष्म अणु -रेणू पदार्थ दिसतात मात्र ब्रह्म दिसत नाही.
-पद्माकर देशपांडे
(निरूपणकार पत्रकार / लेखक)
मोबा. 9420695127