दशक का तिसरे समास सातवा अधिभौतिक तापाचे वर्णन
मागील समासात अध्यात्मिक तापाची लक्षणे सांगितली. आता अधिभौतिक तापाची माहिती देत आहे. सर्व भुतांच्या योगाने सुखदुःखाची निर्मिती होते. त्यामुळे ताप होऊन मन दुःखी होते यालाच आधिभौतिक असे म्हणतात. आधिभौतिकाची लक्षणे निरूपण करू या त्यामुळे तिन्ही तापांची ओळख होईल. ठेचा लागणे, काटे मोडणे, शस्त्रांचे घाव लागणे, शरीरामध्ये धस चिरणे, सुया खुपसणे याला अधिभौतिक ताप म्हणतात.
काचकुयरी आणि आग्या या वनस्पतीमुळे शरीराला होणारा त्रास, गांधील माशीने केलेला दंश म्हणजे आधिभौतिक. माशी, गोमाशी, मुंगी, तेल मुंगी, डास यांचे चावे, जळू चिकटणे याला अधिभौतिक म्हणतात. पिसवा, पिसोळी, कुसळे, मुंगळे, ढेकुण, इसब, भुंगा, गोचीड यांचा उपद्रव हे आधिभौतिक. विंचू चावणे, वाघ, लांडगे, डुक्कर सांबर यांनी केलेला हल्ला म्हणजे आधिभौतिक. रानगाई, रानरेडा,अस्वल, लाव, हत्ती यांचा हल्ला म्हणजे आधिभौतिक. सुसरीने अचानक ओढून नेले, पाण्यात बुडाले, किंवा वाहत्या पाण्यात पडून वाहून गेले याला आधिभौतिक असे म्हणतात.
विषारी साप, आजगर, मगर, जलचर, वनातील विविध पशु यांनी दिलेला उपद्रव म्हणजे आधिभौतिक. घोडा, बैल आणि गाढव, कुत्रा, डुक्कर, माकड, मांजर अशा क्रूर प्राण्यांनी दिलेला उपद्रव अधिभौतिक मानावा. अशी अत्यंत भयानक, दुःखदायक, दारूण दुःखे असतात त्यांना आधिभौतिक असे म्हणतात. भिंती, गच्ची वगैरे पडतात, कडे, भुयारी कोसळतात, वृक्ष अंगावर पडतो याला आधिभौतिक असे म्हणतात. कोणा एकाचा शाप बाधतो, कोणी विपरीत करणी करतात, कोणी वेडे होतात कोणी भ्रष्टविले, कुणी पळवून नेले, चाळविले याला आधिभौतिक म्हणतात. कोणी विष घातले, कोणी दोष दिला, कोणी फास लावला यास अधिभौतिक म्हणतात. अचानक वाघ भेटला, जनावराने हल्ला केला, बिबट्या चिडला याचे नाव आधिभौतिक. इंगळा वरती पाय पडतो, शिळेखाली हात सापडतो, धावताना अडखळून पडतो, याला नाव अधिभौतिक. सरोवर, विहीर, नदी, खड्डा यामध्ये अवचितपणे शरीर पडते याला अधिभौतिक असे नाव आहे.
किल्ल्यावरून कोसळतो, झाडावरून खाली पडतो त्याने दुःखाने आक्रंदन करतो याला अधिभौतिक असे नाव आहे. थंडीने ओठ फुटतात, हातपायाला भेगा पडतात, चिखल्या, उन्हाळ्या लागतात त्याचे नाव अधिभौतिक. उष्ण रसामुळे जीभ पोळते, दात कर करतात, दातात फटी पडतात याचे नाव आधिभौतिक. लहानपणी पराधीन असतो, वाईट शब्द सहन करावे लागतात, अन्न, वस्त्रांची कमतरता भासते याचे नाव होते आधिभौतिक. सासुरवास, गालगुच्चे घेणे, ठोसे, डाग देणे, चिमटे काढणे यामुळे रडू येते याचे नाव आधिभौतिक. चुकल्यावर कान पिळले जातात. डोळ्यात हिंग घातला जातो, सर्वकाळी धाक दाखवला जातो याचे नाव अधिभौतिक. दुर्ज्नांकडून मिळणारा विविध प्रकारचा मार, माहेर दुरावते याचे नाव अधिभौतिक. नाक, कान यांना भोके पाडली, बळजबरीने गोंदवले, चटका दिला याचे नाव अधिभौतिक. परचक्र आल्याने धरून नेले, वाईट प्रदेशात दिले, दुर्दशा होऊन मरण आले त्याचे नाव अधिभौतिक. नाना रोग उद्भवले त्याला आध्यात्मिक म्हणतात पण वैद्य पंचाक्षरी आणले की त्याला अधिभौतिक म्हणतात.
– पद्माकर देशपांडे
(निरूपणकार पत्रकार / लेखक)
मोबा. 9420695127