दशक ३, समास ५
देह परावलंबी झाला. सगळे मित्र मंडळी सोडून गेले. सगळे प्राणिमात्र म्हणायला लागले हा आता केव्हा मरतो? ज्यांना आपण वाढवलं असे ती मुलंसुद्धा विरुद्ध झाली. अशाप्रकारचे प्राण्यावर बिकट वेळ आली. तारुण्य गेले, बळ गेले, संसाराची मस्ती गेली. शरीर आणि संपत्तीची वाताहात झाली. जन्मभर स्वार्थ केला तो सर्व व्यर्थ गेला. अंतकाळी कसा हा विषम काळ आला. सुखासाठी झुरला, त्यासाठीच दुःख कष्ट सहन केले तरी आता यमयातनेचा धोका समोर आला. जन्म हेच दुःखाचे मूळ आहे, दुःखाची इंगळ्या इथे डसतात म्हणून तात्काळ स्वतःचे हित करावे. वृद्धपण सगळ्यात दारूण, म्हणून भगवंतास शरण जावे. वृद्धपणी पस्तावा होतो तोच अंतकाळी पुन्हा भोगावा लागतो. मागच्या जन्मामुळे पुन्हा मातेचे उदर प्राप्त होते. अतिदुस्तर संसार पुन्हा आपल्याला पहावा लागतो. हे जन्माचे दुःख नाहीसे होण्यासाठी भगवतभजना शिवाय दुसरा काही उपाय नाही. जन्माच्या तीन तापांची कथा मी पुढे सांगतो.
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सगुण परीक्षा नाम समास पंचम समाप्त.
दशक तिसरे समास सहावा त्रिविध ताप वर्णन
आता त्रिविध तापाची लक्षणे निरूपण करीत आहे ती श्रोत्यांनी एकाग्र होऊन श्रवण करावी. तापलेला पदार्थ पाण्याच्या स्पर्शाने शांत होतो त्याप्रमाणे तिन्ही तापांनी पोळलेला माणूस संतांच्या सहवासामुळे शांत होतो. भुकेलेल्याला अन्न मिळाल्याने, तहानलेल्याला पाणी मिळाल्याने आणि बंधनात पडलेल्याला मुक्त केल्याने सुख होते. जो महापुरात सापडला आहे त्याला पैलतीरावर नेल्यावर सुखी होतो. स्वप्नांमध्ये एखादे दुःख झाल्यास तो जागा झाल्यावर ते दुःख नष्ट होते. एखाद्यास मरण आले असता त्याला जीवदान द्यावे किंवा संकटाचे निवारण करावे त्यामुळे सुख होते. रोग्याला औषध दिले की त्याला आरोग्य प्राप्त होते त्यामुळे तो आनंदित होतो. त्याप्रमाणे संसारामुळे दुःखी झालेला त्रिविध तापांनी पोळलेला परमार्थाचा अधिकारी झाल्यास त्याला सुख मिळते. आता ते त्रिविध ताप कोणते ते सांगतो. पहिला ताप अध्यात्मिक, दुसरा आधिभौतिक, तिसरा आधिदैविक होय. आधी अध्यात्मिक ताप कसा आहे त्याची ओळख काय त्याची लक्षणे आपण जाणून घेऊया. नंतर आधिदैविक ताप कसा असतो त्याचीही लक्षणे विस्तारपूर्वक सांगतो.
वक्त्याने कथेचा विस्तार सुरू केला आता अध्यात्मिक तापाची लक्षणे सावधपणे ऐका. देह इंद्रिय आणि प्राण याच्या योगे आपण विविध सुखदुःख भोगतो त्याचे नाव अध्यात्मिक होय. देहामधून आले, इंद्रिय आणि प्राण यांना दुःख झाले ते अध्यात्मिक होय. आता देहामधून प्राण्याला कोणतं दुःख येतं हेही विशद करून सांगतो. खरुज, खवडे, पुळ्या, नारू, नखर्डे, मांजरे, देवी, गोवर हे देह यामधील विकार अध्यात्मिक म्हणून ओळखले जातात. काखमांजरी, केसतोड, सडके व्रण, काळे फोड, व्याधी, मुळव्याध, असह्य दुखणे याला अध्यात्मिक ताप म्हणतात. बोटांचे दुखणे, गालफुगी,कंड, हिरडी सुजणे, दातात भरणारी कस्पटे याला आध्यात्मिक असे नाव आहे. शरीरावर फोड उठतात, अंग सुजते, वात माजतो याला अध्यात्मिक म्हणतात. नायटे, हाड्या व्रण, गजकरण, जलोदर, पोट फुगणे, कान फुटणे याला आध्यात्मिक असे नाव आहे.
कुष्ठ आणि ओले कुष्ट, पंडुरोग म्हणजे रक्तक्षय, क्षयरोग याला आध्यात्मिक असे नाव आहे. पोटशूळ, अर्धशिशी, कपाळ दुखणे याला अध्यात्मिक दुःख असे नाव आहे. कंबर दुखणे, मान दुखणे, पाठ दुखणे, मान दुखणे, तोंड दुखणे, अस्थी, सांधे दुखणे याला आध्यात्मिक ताप असे नाव आहे.
– पद्माकर देशपांडे
(निरूपणकार पत्रकार / लेखक)
मोबा. 9420695127