आपल्या माय बापाचे भजन करतात आणि जीवलगांशी निष्ठुर वर्तन करत नाहीत ते धन्य होत. स्त्री आणि बालकांची संगती ही जन्माची साथ सोबत आहे पण आई वडील पुन्हा कधी भेटतील का? पूर्वी हे ऐकलं होतं पण त्यावेळी समजलं नाही. रतीसुखाच्या डोहामध्ये मन बुडून गेलं. पत्नीही खूप आवडत राहिली ती म्हणजे आपलं वैभव असं वाटायला लागलं पण आता रितेपण वाटायला लागलं. आता काहीही करून पैसे मिळवून यावं; रिकाम्या हाताने येऊ नये. त्यामुळे दुःख वाढेल अशा प्रकारची विवंचना त्याला वाटायला लागली. चिंतेच्या महापुरामध्ये तो बुडून गेला. आपला देह आपला पराधीन केला. कुटुंब काबिल्यामुळे ईश्वराकडे दुर्लक्ष केले. या कुटुंबाच्या मायेसाठी सगळा जन्म असाच वाया गेला असा शेवटी त्याला पस्तावा झाला. क्षणभर तो उदास झाला. मग पुन्हा मायाजाळात गुरफटला. आपल्या मुला-मुलींची आठवण झाली, आपली मुळे अंतरली याची मनातून खंत वाटायला लागली. मागचे दुःख आठवले जे होतं ते प्राप्त झाले, ते आठवून मग तो मोठ्याने रडू लागला. अरण्यरूदन केले तर कोण थांबवणार? मग मनाची समजूत घालून प्राप्त होईल ते भोगावे. असे तो म्हणाला. अशा प्रकारे दुःखाने तो निराश झाला आणि पुन्हा विदेशात गेला आता पुढे काय झालं ते सावधपणे ऐका.
इती श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे स्वगुणपरीक्षा नाम समास चतुर्थ समाप्त.
दशक तिसरे समास पाचवा स्वगुणपरीक्षा
पुढे विदेशात गेला. प्राण्याने नोकरी धंदा सुरू केला. नाना प्रकारचे श्रम तो करायला लागला. अशा प्रकारचा दुस्तर संसार आहे त्यामुळे तो खूप काबाडकष्ट करायला लागला. पुढे दोन चार वर्षे तिथे राहिला. त्याने पैसे मिळवले. मग तो आपल्या देशामध्ये पुन्हा आला तर इकडे दुष्काळ पडलेला. त्या दुष्काळामुळे सुद्धा त्याला खूप कष्ट झाले. त्या दुष्काळामुळे एकाची कायमची गालफडे बसली, एकाचे डोळे निस्तेज झाले, एक दीनवाणेपणाने चळचळा कापायला लागला. काही गरिबासारखे बसले, एकाच्या अंगावर सूज आली, एक तर मेले. अशी कन्यापुत्र अचानक पाहायला मिळाली. त्याने तो खूप दुःखी झाला. ते पाहून त्याला अतिशय गहिवर आला. दैन्यवाणे तो आक्रंदन करू लागला. तेव्हा त्याला पाहून घरातले सावध झाले. ते म्हणू लागले, बाबा आता जेऊ घालेल. त्यामुळे त्यांनी आशाळभूतपणे झडप घातली. त्यांनी गाठोडे सोडून पाहिले, हाती लागले ते खाऊ लागले. काही तोंडात काही हातात घेऊन खाऊ लागले. घाईघाईने जेवताना काही मेली काही बुभुक्षित झाली. काही जास्त भोजन केल्याने अजीर्ण होऊन मेली. अशी बहुतेक मुले मरण पावली फक्त एक दोन उरली. तीही माता नसल्याने दीनवाणी झाली. अशा अवर्षणामुळे घर बुडाले. पुढे पुन्हा धनधान्याची समृद्धी आली. मुलांना वाढवायचे, आपल्या हाताने स्वयंपाक करायचा, त्याचा खूप त्रास होत होता. लोकांनी भरीस घातले त्यामुळे पुन्हा लग्न केले. हातात असलेले पैसे लग्नासाठी खर्च केले. पुन्हा विदेशात गेला. पैसे मिळवून आला. तेव्हा सावत्र मुलांमध्ये कलह निर्माण झाला. नवी बायको वयात आली. मात्र हा म्हातारा झाला, त्याची शक्ती गेली. त्यामुळे तिला मूल होईना.
– पद्माकर देशपांडे
(निरूपणकार पत्रकार / लेखक)
मोबा. 9420695127