स्वगुण परीक्षा नाम दशक तृतीय
श्रीराम
जन्म म्हणजे दुःखाचा अंकुर. जन्म म्हणजे श्लोकाचा सागर. जन्म म्हणजे हलविता न येणारा भयाचा डोंगर. जन्म म्हणजे कर्माचा साचा, जन्म म्हणजे पातकांची खाण, जन्म म्हणजे नित्य नवी काळाची परीक्षा. कुविद्येचे फळ म्हणजे जन्म, लोभाचे कमळ म्हणजे जन्म, ज्ञानहीन भ्रांतीचे पटल म्हणजे जन्म. जीवाला बंधन म्हणजे जन्म. मृत्यूचे कारण म्हणजे जन्म, आकारण गुंतवणूक म्हणजे जन्म. जन्म म्हणजे सुखाचा विसर, जन्म म्हणजे चिंतेचे आगर, जन्म म्हणजे वासनेचा विस्तारलेला विस्तार. जन्म म्हणजे जीवाची अवदसा, जन्म म्हणजे कल्पनेचा ठसा, जन्म म्हणजे ममतारुपी डाकीणीचे झपाटणे. जन्म म्हणजे मायेची लबाडी, जन्म म्हणजे क्रोधाचे वीरत्व. जन्म म्हणजे मोक्षास आडवे आलेले विघ्न. जन्म म्हणजे जीवाचे मीपण, जन्म म्हणजे अहंतेचा गुण, जन्म हे ईश्वराचे विस्मरण. विषयांची आवड म्हणजे जन्म. वाईट आशांची बेडी म्हणजे जन्म. भक्षण करीत असलेली काळाचे काकडी म्हणजे जन्म. जन्म म्हणजे विषमकाळ, जन्म हाच वाईट वेळ, जन्म म्हणजे अत्यंत घाणेरड्या नरकातील पतन.
शरीराचे मूळ पाहिले तर तितके दुसरे अमंगल काहीही नाही. रजस्वलेचा जो विटाळ असतो त्यामध्ये जन्म होतो. त्या विटाळाच्या पुतळ्यात निर्मळपणाचा सोहळा कसा घडेल? रजस्वलेचा विटाळ त्याचा आटून गाळ तयार होतो त्या गाळाचेच शरीर तयार होते. वरवर ते वैभवाचे दिसते आत मध्ये मात्र नरकाचे पोतडे असते. चामड्याच्या कुंडाचे झाकण उघडता येत नाही तसेच ते असते. चामड्याचे कुंड धुतल्यावर शुद्ध होते, मात्र शरीर धुतले तरी देहाची दुर्गंधी जात नाही. शुद्धता येत नाही. हाडाचा सापळा तयार केला, त्याला शिरा नाड्या यांनी गुंडाळलं, त्यावर ती विविध अवयवात सांध्यासांध्यात मेदमांस भरलं. त्यामध्ये रक्त भरलं. असा हा अशुद्ध देह असून या देहामध्ये नाना व्याधी दुःखे राहतात. शरीरामध्ये आतबाहेर लीडबीडलेले नरकाचे कोठार असते. दुर्गंधीयुक्त मुत्राचे पोतडे त्यात असते. जंत किडे आणि आतडी म्हणजे नाना दुर्गंधाची पोतडी. त्यामध्ये हलणारी कंटाळवाणी कातडी दिसते.
सर्व देहामध्ये मस्तक हे महत्त्वाचे पण तिथेही सर्दी-पडशामुळे नाक वाहते, कान फुटतात तेव्हा सहन न करण्यासारखी दुर्गंधी येते. डोळ्यामधून चिपडे, बाहेर येतात नाकात मेकडे दाटतात, सकाळी सकाळी तोंडातून मलासारखी घाण पडते. लाळ, थुंका आणि मळ, पिवळा कफ बाहेर पडतो आणि त्याला चंद्रासारखे मुखकमल असे म्हणतात! असे घाणेरडे तोंड दिसते तर पोटामध्ये विष्ठा भरलेली असते. ती प्रत्यक्ष तुम्हाला दिसते. पोटामध्ये कितीही चांगलं अन्न घातलं तरी काहीची विष्ठा तर काहीचे वमन होते. गंगेचे पवित्र पाणी प्यायले तर त्याची लघुशंका होते. मलमूत्र वमन हेच जीवन आहे. त्यामुळेच देह वाढतो यात संशय नाही. पोटामध्ये मलमूत्र ओक नसेल तर सगळे लोक मरून जातील!
राव असो किंवा रंक पोटामध्ये विष्ठा असतेच. सगळं साफ करायला गेलं तर शरीर नाहीस होईल. देहाची व्यवस्था अशी असते. वरपासून खालपर्यंत असा हा देह धड असेल तरी त्याची अशी अवस्था असते तर दुर्दशा झाल्यावरती काय होईल ते सांगता येत नाही? नऊ महिने अत्यंत कष्टामध्ये काराग्रह प्रमाणे देह पोटात राहतो. यावेळी दोन डोळे, दोन कान, नाकाची दोन छिद्रे, मूत्र द्वार व गुदद्वार हे बंद राहतात. वायू कुठून मिळणार?. ओक आणि नरकाचे रस झिरपत असतात ते जठराग्नीमुळे तापतात. यामुळे अस्थिमांसाचे शरीर उकडते.
– पद्माकर देशपांडे
(निरूपणकार पत्रकार / लेखक)
मोबा. 9420695127