तपस्वी-बैरागी आले त्यांना राहण्यासाठी जागा देणे तो सत्वगुण. घरामध्ये काही नसले तरी येणारा अतिथी विन्मुख जाऊ नये म्हणून म्हणून शक्तीनुसार त्याला काही तरी देतो तो सत्वगुण. ज्याने जिभेवर ताबा मिळवला, ज्याची वासना तृप्त झाली, ज्याला कोणतीही इच्छा उरली नाही तो सत्वगुण जाणावा. प्रपंचामध्ये आघात होतात, घडणारे घडतच राहते तरीदेखील ज्याचे चित्त डळमळीत होत नाही तो सत्वगुण. एका परमेश्वरासाठी ज्याने सर्व सुख सोडले, देह परमेश्वराला अर्पण केला तो सत्वगुण.
विषय-वासना निर्माण झाली तरी ज्याचे चित्त डळमळीत होत नाही, धैर्य कमी होत नाही, विविध संकटांनी ग्रासले, भूक-तहान यांच्यामुळे ग्रासला तरी निश्चय कायम ठेवतो तो सत्वगुण. श्रवण आणि मनन, नीजध्यासाने समाधान, त्यातून आत्मज्ञान झाले तो सत्वगुण. ज्याला अहंकार नाही, जो अनासक्त आहे, ज्याच्याकडे दया आहे तो सत्त्वगुणी जाणावा. सर्वांशी नम्रपणाने बोलतो, मर्यादेने वागतो, सर्वांना आनंदित करतो तो सत्वगुण. सगळ्यांशी प्रेमाने बोलतो, कोणाला विरोधास वाव देत नाही, परोपकारासाठी जीव अर्पण करतो तो सत्त्वगुण. स्वतःचे काम करण्यापेक्षा दुसऱ्याचं काम कराव, मरण आले तरी कीर्ति मागे उरवावी तो सत्वगुण. दुसऱ्याचे दोष पहात नाही, समुद्राप्रमाणे ज्याचे हृदय विशाल आहे तो सत्वगुण. वाईट बोल सहन करणे, प्रत्युत्तर न देणे, आलेला राग आवरणे हा सत्वगुण. अन्याय करून गंजतात, त्रास देतात, नाना प्रकारे पीडा करतात तरी ते मनात ठेवतो तो सत्वगुण. शरीराने झिज सहन करणे, दुर्जनाकडे लक्ष न देणे, नींदकावर उपकार करणे हा सत्त्वगुण.
मन भलतीकडे धावते, ते विवेकाने आवरावे. इंद्रियदमन करावे तो सत्वगुण. चांगली कृती करावी, वाईट कृती त्यागावी, भक्तीची वाट धरावी तो सत्वगुण. ज्याला सकाळी लवकर स्नान करणे आवडते, पुराण श्रवण करणे आवडते, नाना देवतांची पूजा करणे आवडते, मंत्र म्हणणे आवडते तो सत्त्वगुण. पर्वकाळ असेल तर वसंतपूजेसाठी तयार राहतो, साधुसंतांची जयंती साजरी करतो तो सत्वगुण. विदेशी मरण आलेल्यास संस्कार देणे, मदत करणे हा सत्वगुण. एखाद्यास कोणी मारत असेल तर त्याच्याकडे जाऊन त्याला मारण्यापासून परावृत्त करतो, जीव बंधनातून मुक्त करतो तो सत्वगुण. शिवलिंगावर अभिषेक करतो, नामस्मरणावर विश्वास ठेवतो, देवदर्शन करतो तो सत्वगुण. संत पाहून दर्शनासाठी धावतो. भक्तीमुळे त्याचे हृदय उचंबळते, तो संताना सर्वभावे नमस्कार करतो, हा सत्वगुण. ज्याच्यावर संतांची कृपा झाली त्यामुळे त्याचा वंश उद्धरला तो सत्व गुणामुळे ईश्वराचा अंशच झाला. तो इतरांना सन्मार्ग दाखवतो, लोकांना हरिभजनात लावतो. अज्ञानी माणसाला ज्ञान देतो तो सत्वगुण.
पुण्यसंस्कार आवडतात, प्रदक्षणा नमस्कार करतो, त्याचे पाठांतर भरपूर असते तो सत्वगुण. भक्तीची अंतःकरणपूर्वक आवड असते. त्यातून तो ग्रंथ निर्मिती करतो. धातुच्या विविध मूर्तीचे पूजन करतो तो सत्वगुण. देवाची उपकरणे स्वच्छ करतो, विविध साहित्य आसने वस्त्रे नीट ठेवतो तो सत्वगुणी. दुसर्याचे दुःख ते आपले दुःख, दुसऱ्याच्या सुखात आपले सुख. वैराग्य पाहून आनंद होतो. दुसऱ्याचे भूषण ते आपले भूषण दुसऱ्याला दोष देणे म्हणजे आपल्याला दूषणे देणे. दुसऱ्याच्या दुःखामुळे दुःख होणे तो सत्वगुण. आता हे बरेच वर्णन केले ज्याचे चित्त देवधर्माकडे असेल, जो कामनारहित देवाचे भजन करत असेल तो सत्व गुण होय. असा हा सत्वगुण संसार सागर तारणारा आहे. त्याच्यामुळे ज्ञान मार्गाचा विवेक जागृत होतो. सत्व गुणामुळे भगवतभक्ती, सत्वगुणामुळे ज्ञानप्राप्ती होते. सत्वगुणामुळे सायुज्यमुक्ती प्राप्त होते. अशी ही सत्त्वगुणाची महती असून थोडक्यात यथामती सांगितली. श्रोत्यांनी सावध होऊन होऊन पुढील कथेकडे लक्ष द्यावे.
इतिश्री दासबोधे गुरुशिष्यसंवादे सत्वगुण नाम समास सप्तम समाप्त.
– पद्माकर देशपांडे
(निरूपणकार पत्रकार / लेखक)
मोबा. 9420695127