संध्येसाठी मठ आणि तळघरे, नदीच्या तीरावर पायऱ्या दीपमाळा बांधणे, देवाच्या मंदिरावर कळस चढवणे हा सत्वगुण. देवाच्या द्वारी भांडारगृह, भोजनालय बांधले जाते तो सत्वगुण. नाना देवांच्या स्थानी नंदादीप लावणे, देवाला अलंकार भूषणे अर्पण करणे हा सत्वगुण. मृदंग टाळ दमामे नगारे इत्यादी नाना वाद्यांचा सुस्वर कल्लोळ करणे हा सत्वगुण. देवळासाठी नाना सामुग्री अर्पण करणे, हरी भजन करणे हा सत्वगुण. छत्रे आणि आसने, पालखी-दिंड्या-पताका निशाणे, चामरे, अब्दागिरी यांचा वापर हा सत्त्वगुण. वृंदावने तुलसीवने, रांगोळ्या, सडासंमार्जन प्रेमाने करणे म्हणजे सत्वगुण होय. नाना पूजेची उपकरणे घासून पुसून स्वच्छ करणे, मंडप घालणे, आसने देवास अर्पण करणे हा सत्वगुण. देवासाठी खाद्य नाना प्रकारचे नैवेद्य फळे अर्पण करणे हा सत्वगुण. भक्तीच्या आवडीमुळे विविध सेवा मनापासून करणे, देवाचे दार झाडणे तो सत्वगुण. तिथी- पर्व-महोत्सव असेल तेथे काया वाचा मने सहभाग घेणे तो सत्वगुण.
हरीकथेमध्ये गंध-माळा-बुक्का लावणे, सेवा करण्यासाठी निरंतर उभे असणे, नर अथवा नारी यथानुशक्ती विविध साहित्य देवद्वारी घेऊन उभे राहणे तो सत्वगुण. आपली कामे सोडून लगबगीने मंदिरामध्ये येणे व भक्ती कार्यात भाग घेणे तो सत्वगुण. मोठेपणा दूर ठेवून, छोटी छोटी काम देखील करतो देवाच्या द्वारी वाट पाहतो तो सत्वगुण. देवासाठी उपोषण करतो. भोजन-विडा याचा त्याग करतो. नित्यनेमाने जप-ध्यान करतो तो सत्वगुण. कठोर शब्द बोलत नाही. नियमधर्माने चालतो, योगी लोकांना आनंदित करतो तो सत्वगुण. आपला गर्व सोडून कुठलीही अपेक्षा न धरता कीर्तन करतो, त्या फिर्तना मुळे अंगावर रोमांच उभे राहतात तो सत्वगुण. परमेश्वराचे ध्यान केल्यामुळे डोळे भरून येतात, देहाचे विस्मरण होते तो सत्व गुण होय. हरी कथेची अत्यंत प्रीति असल्याने तिचा कंटाळा येत नाही. कायम ही प्रीती वाढत राहते तो सत्वगुण. मुखामध्ये नाम, हातात टाळी देवाचे, नाव घेत नाचतो, परमेश्वराची पायधूळ डोक्याला लावतो तो सत्वगुण. देहाभिमान नाहीसा होतो, वैराग्य विषय प्रबळ होतो, माया मिथ्या आहे हे समजतं तो सत्वगुण. संसारात गुंतू नये, याच्यासाठी काय उपाय करावा असं मनात वाटतं तो सत्वगुण. संसारात असल्याने काही भजन करावं असं वाटतं. मनामध्ये ज्ञान उत्पन्न होतं तो सत्वगुण.
आपापल्या घरी काम करीत असताना नित्यनेमाने रामाविषयी प्रीती जागृत होते तो सत्वगुण. सगळ्याचा वीट आलेला आहे, परमार्थात रस वाटतो, काही आघात झाला तरी धीर कायम राहतो तो सत्वगुण. नेहमी उदासीन, नाना भोगांमध्ये मन रमत नाही, नेहमी परमेश्वराची भक्ती आठवते तो सत्वगुण. वस्तूंमध्ये चित्त लागत नाही. मनामध्ये फक्त परमेश्वर आठवतो ही भावना दृढ होते तो सत्त्वगुण होय. लोक नावे ठेवतात तरी देवावर प्रेम करतो, मनामध्ये परमेश्वराचे विचार करतो तो सत्वगुण. अंतकरणात स्फूर्ती निर्माण होते, स्वस्वरूपी मन लागते, मनातील संदेह नष्ट होतात तो सत्वगुण. शरीर कारणी लावावे, दृढनिश्चय अंतकरणात निर्माण व्हावा ही सत्त्वगुणाची करणी होय. शांति क्षमा आणि दया हे उत्पन्न झाले तेथे सत्वगुण निर्माण झाला हे निश्चितपणे जाणावे. आलेले अतिथी-अभ्यागत यांना जेवल्याशिवाय जाऊ देत नाही, यथानुशक्ती दान देतो तो सत्वगुण.
– पद्माकर देशपांडे
(निरूपणकार पत्रकार / लेखक)
मोबा. 9420695127