देवाला मुंडके वहाणे किंवा देह समर्पण करणे, उतारावरून गडबडा लोळण्याचा नवस हा तमोगुण. निग्रह करून धरणे, टांगून घेणे देवाच्या द्वारी जीव देणे हा तमोगुण. काहीही न खाता उपोषण करणे, पंचाग्नी धूम्रपान करणे, स्वतःला पुरून घेणे हा तमोगुण. सकाम अनुष्ठान करणे, वायु निरोधन करून पडून राहाणे तो तमोगुण. नखे, केस वाढवावे, हात वरती करावे किंवा मौनव्रत पाळावे तो तमोगुण. नाना निग्रहकरून देहाला यातना देणे, क्रोधाने देवाची मूर्ती फोडावी, तो तमोगुण. देवाची निंदा करतो, अघोरी आशा धरतो, संत संग करीत नाही तो तमोगुण. असा हा तमोगुण असाधारण आहे मात्र त्याचा त्याग करावा यासाठी त्याचे निरूपण केले. तमोगुण हा पतनास कारण असून त्यामुळे मोक्षप्राप्ती होत नाही. त्यामुळे केल्या कर्माचे फळ मिळेल, मात्र जन्माचे दुःख दूर होणार नाही. जन्म मृत्यूचे खंडन होण्यासाठी सत्वगुण आवश्यक असून त्याचे निरुपण पुढील समासात करीत आहे.
इतीश्री दासबोधे गुरुशिष्यसंवादे तमोगुण नाम समास षष्ठ समाप्त.
दशक दुसरे समास सातवा सत्वगुण वर्णन
मागील समासात आपण अत्यंत दुःखदायक, दारुण अशा तमोगुणाचे वर्णन ऐकले. आता दुर्लभ अशा सत्त्वगुणाची माहिती ऐका. सत्वगुण हा भजनाचा आधार, योगियांचा तीर संसारातील दुःखाचे मूळ निवारण करणारा असा आहे. त्याच्यामुळे उत्तम गती मिळते. परमेश्वराकडे जाण्याचा मार्ग सापडतो. सायुज्यमुक्ती मिळते. भक्तांची कणव करणारा, भवसागर तरून जाण्याचा खात्रीशीर मार्ग, मोक्षलक्ष्मी पर्यंत पोहोचण्याचा सोपान म्हणजे सत्वगुण होय. सत्वगुणामुळे परमार्थाची स्थापना होते. महंताचे भूषण, रज आणि तम गुणांचा निरास म्हणजे सत्वगुण. तो अत्यंत सुखकारी आहे. तो आनंदाची लहर निर्माण करून जन्म-मृत्यूचे निवारण करतो. जो ज्ञानाचा शेवट आहे, पुण्याचे मूळपीठ आहे, याच्यामुळे परलोकाची वाट सापडते.
असा हा सत्वगुण देहामध्ये उमटल्यावर कशी कृती घडते त्याची लक्षण अशी असतात. ईश्वराविषयी अधिक प्रेम असते, प्रपंचातही लौकिक संपादन केला जातो, सदा विवेकाने विचार केला जातो तो सत्व गुण होय. संसार दुःख विसरते, निर्मळ भक्ती मार्ग दाखवितो, भजनाची कृती त्याच्यामुळे निर्माण होते तो सत्वगुण होय. परमार्थाची आवड निर्माण होते, भावार्थाची गोडी लागते, परोपकार करण्याची गरज भासते तो सत्व गुण. स्नान-संध्या करणारा, पुण्यशील, अंतर्बाह्य निर्मळ शरीर आणि वस्त्रे, सोजवळ असतील तोच असतो सत्वगुण. यज्ञ आणि याग करणे आणि करविणे, अध्ययन आणि अध्यापन, स्वतः दान पुण्य करतो तो सत्वगुण होय. निरुपणाची आवड असते. हरीकथेची गोडी लागते. वर्तनामध्ये सुधारणा होते तो सत्वगुण. अश्वदान, गजदान, गोदान, भूमीदान नाना रत्नांची दाने केली जातात तो सत्वगुण. अन्नदान, वस्त्रदान,पाण्याचे दान, सज्जनांचे पूजन म्हणजे सत्वगुण होय. कार्तिक स्नान, माघ स्नान, व्रत उद्यापन, निष्काम तीर्थयात्रा, उपोषण म्हणजे सत्वगुण. सहस्रभोजने, लक्ष भोजने, विविध प्रकारची दाने कोणतीही अपेक्षा न करता केली जातात तो सत्वगुण होय.
मात्र इच्छा ठरवून केल्यास तो तमोगुण होतो. तीर्थक्षेत्री जमीन अर्पण करणे, सरोवरे बांधणे, देवालये बांधणे हा सत्वगुण होय. तीर्थक्षेत्रे, पाठशाळा उभारणे, धर्मशाळा उभारणे, पायऱ्या उभारणे, पिंपळाला पार बांधणे, तुळशीचे वृंदावन तयार करणे हा सत्वगुण होय. वने-उपवने, पुष्पवाटिका, पाण्याचे तळे तयार करणे, तपस्वी लोकांचे मन शांत करतो तो सत्वगुण.
– पद्माकर देशपांडे
(निरूपणकार पत्रकार / लेखक)
मोबा. 9420695127