आपले ध्यान आठवले की परम समाधान वाटते, मन ध्यानावस्थेत लागून केवळ नेत्रात स्थिर होते. आपल्या सगुण रुपाची ठेवण महालावण्यवान असून आपण सुंदर नृत्य करता तेव्हा सर्व देव पाहतच राहतात. सदाकाळ अत्यंत आनंदित, मदोन्मत्त, आनंदाने डोलणारे, हर्षाने उल्हासित झालेले, प्रसन्न वदन असलेले असे आपले रूप असते. आपले रूप भव्य असून आपली मूर्ती भीमकाय प्रचंड आहे, मस्तकावर उदंड शेंदूर चर्चिला आहे. नाना सुगंध आपल्या गंडस्थळावरून ओसंडत असून भोवती मधुर गुंजारव ऐकायला मिळतो. आपली सोंड सरळ पण किंचित वळवलेली असून आपल्या रुपास शोभत आहे. चौदा विद्यांचे आपण स्वामी असून आपले डोळे हलवतात, मध्येच आपले कान फडफडविता. डोक्यावर रत्नखचित तेजस्वी मुकुट झळकत आहे, त्यावरील नाना ठसठशीत रत्ने प्रकाशकिरण फेकीत आहेत. कानातील कुंडले त्यावरील नील रत्ने तळपत आहेत, सुवर्णाची रत्नखचित कडी, शुभ्र दांत चमकत आहेत. सापाचा कडदोरा घातलेला त्यावरील हलणारे पोट, लहान लहान घंटांचा मंद नाद मोहित करीत आहे. चार भुजा असलेले, कमरेस पितांबर असलेले अंगावरील नाग फुत्कार टाकत आहे. मध्येच तो नाग मस्तक डोलवून जीभ बाहेर काढून नाभिवरून टकमका पाहतो आहे. आपल्या गळ्यातील नाना पुष्पमाला रत्नजडीत माळा शोभत आहेत तर हृदयकमळावर रत्नजडीत पदक शोभत आहे. परशु, आणि कमळ, अंकुश आणि मोदक आपल्या हातात शोभत आहे. कौशल्य, नाट्यपूर्ण हालचाली, नृत्य करीत हुंकार करीत असलेल्या आपल्याला एक क्षण देखील स्थिरता नाही. साजिरी, सुंदर मूर्ती चपळ लावण्याची खाण असून हालचाली करीत आहे. आपल्या पायातील नुपुरे रुणुझुणु वाजत आहेत. वाक्यांचा गजर होतो आहे. दोन्ही पावलातील घागऱ्या देखील मनोहर आवाज करीत आहेत.
आपल्या उपस्थितीमुळे ईश्वर सभेस शोभा आली आहे. आपल्या दिव्य वस्त्रांची प्रभा सर्वत्र फाकली असून साहित्यातील अष्ट नायिका आनंदित झाल्या आहेत. असा सर्वांग सुंदर, सर्व विद्यांचा स्वामी त्याला माझा साष्टांग नमस्कार. गणेशाच्या रूपाचे वर्णन केले असता भ्रांत माणसाच्या बुद्धीत प्रकाश पडतो. गणेशाच्या गुणांचे वर्णन श्रवण केले असता सरस्वती प्रसन्न होते. ज्याला ब्रह्मादिक वंदन करतात, त्याच्यापुढे मानव काय? मंदमती प्राण्यांनी देखील गणेशाचे स्मरण करावे. गणेशाला वंदन केले असता जे मूर्ख, अवलक्षणी असतील, हीनाहून हीन असतील, ते देखील सर्व विषयात दक्ष प्रवीण होतात. असा जो परम समर्थ आहे, तो मनोरथ पूर्ण करतो. त्या कल्लौ विनायकाने अनुभवयुक्त भजन परिपूर्ण करावे ही प्रार्थना. अशा मंगलमुर्ती गणेशाचे मी परमार्थाची इच्छा धरून यथामती स्तवन केले. इति श्री दासबोधे गुरू शिष्य संवादे गणेश स्तवन नाम समास द्वितीय समाप्त.
दशक १ समास ३ शारदा स्तवन नाम समास
जय जय रघुवीर समर्थ. जी शब्दांची स्फूर्ती निर्माण करते. आपल्या वाणीद्वारे शब्दांचे अर्थ उलगडून दाखवते. जी योग्यांची समाधीअवस्था आहे. धारिष्ट धरणाऱ्यांची निश्चय बुद्धी आहे. जी अविद्यारूपी उपाधी तोडून टाकते, जी ईश्वराची भार्या आहे, अति संलग्न तुर्यावस्था आहे. जिच्यासाठी साधूजन महत्कार्य करण्यास प्रवृत्त झाले आहेत, जी महंतांची शांती आहे, जी ईश्वराची निजशक्ती आहे, जी निस्पृहता हीच कोणी एक वैभव आहे अशा ज्ञानी जनांची विरक्ती आहे.
पद्माकर देशपांडे
(निरूपणकार पत्रकार / लेखक)
मोबा. 9420695127