जय जय रघुवीर समर्थ. आकाशात वायूच्या हालचाली शिवाय जसा शब्द किंवा आवाज होत नाही त्याप्रमाणे निश्चळ स्वरूपात चंचलत्वाशिवाय इच्छा किंवा स्फूर्ती होणं शक्य नाही. मृदुपणा म्हणजेच पाणी, जडपणा म्हणजे पृथ्वी तशी मूळमाया ही पंचभूतीक जाणावी. एका एका भुतांच्या मध्ये पंचभूते राहतात असे वाटते, पण सूक्ष्म दृष्टीने पाहायला तर काहीच नसते. पुढे ती दिसतात तरी ती म्हणजे विस्तारलेली माया अर्थात पंचमहाभूते आहेत. मूळ माया ही किंवा अविद्या स्वर्ग मृत्यु पाताळ यांचीच पाच भुते आहेत.
सत्य स्वरूप हे आदि-अंती आहे, त्यातच पंचभूते असतात पण त्याच्यामध्ये मूळ माया हेच मूळ आहे, असे श्रोत्यांनी जाणावे. इथे एक शंका उत्पन्न झाली, ती सावधपणे ऐका. पंचभूते तमोगुणापासून झाली, आणि मूळ माया गुणांपासून वेगळी आहे मग भुते कशी होतील? अशा प्रकारची शंका श्रोत्यांनी मागे विचारली होती. त्या शंकेला पुढल्या समादसमध्ये उत्तर देत आहे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सूक्ष्म आशंका नाम समास तृतीय समाप्त.
दशक ८ समास ४ सूक्ष्म पंचभूते निरुपणनाम समास
जय जय रघुवीर समर्थ मागे विचारलेल्या प्रश्नाचे मूळ आता सांगतो त्यासाठी क्षणभर इकडे लक्ष द्या. ब्रह्मापासून मूळमाया झाली तिच्या पोटी माया आली तिने गुण प्रसवले, म्हणून तिला गुणक्षोभिणी असे म्हणतात. पुढे तिच्यापासून सत्व रज तम गुण आणि तमोगुणापासून पंचभूते निर्माण झाली. अशी भूते उद्भवली तिच्यापासून तत्त्व विस्तारली. तमोगुणापासून सगळी पंचमहाभूते झाली. मूळमाया गुणांपासून वेगळी आहे तिथे भुते कशी होतील, अशी शंका श्रोत्यांनी मागे घेतली होती त्याचे उत्तर देतो आणि एकेक मिळून पाच भुते असतात त्यांचीही माहिती समजावून सांगतो. मूळमाया पंचभूतिक कशी असते हे श्रोत्यांनी समजावून घेतले पाहिजे.
आधी भुते ओळखावी, त्यांची रूपे जाणावी, मग सूक्ष्मदृष्टीने ती पहावी. अंतरात्म्याची ओळख नसेल तर ती कशी ओळखता येतील? म्हणून क्षणभर त्याची माहिती ऐकावी. जे जे जड आणि कठीण आहे ते ते पृथ्वीचे लक्षण आहे. मृदु आणि ओलेपण आहे ते पाण्याचे लक्षण, उष्ण आणि तेज असलेले आहे ते अग्नीचे लक्षण आहे. आता वायू कसा आहे ते सांगतो चैतन्य आणि चंचल म्हणजे वायू आणि निश्चल असलेले शून्य अवकाश किंवा पोकळी म्हणजे आकाश. अशा प्रकारची पंचमहाभूते ओळखावी. आता त्याची अधिक माहिती सांगतो. त्रिगुणापेक्षाही वेगळे त्याचा सुक्ष्म विचार करू या. त्यासाठी शांतपणे लक्ष देवून ऐका. सूक्ष्म आकाशामध्ये पृथ्वी कशी आहे, ते आधी एकाग्र चित्त करून ऐकावे. आकाश म्हणजे शून्य, पोकळी. शून्य म्हणजे अज्ञान अज्ञान. अज्ञान म्हणजे जडत्व म्हणजेच पृथ्वी! आकाश स्वतःलाच मृदू आहे ते स्वतः सिद्ध आहे. आता तेज कस असतं ते विशद करून सांगतो. अज्ञानामुळे भास झाला तोच तेजाचा प्रकाश आहे. आता वायू सावकाश विस्तार करून सांगतो. अशा तऱ्हेने पंचमहाभूतांची माहिती समर्थ रामदास स्वामी देत आहेत. पुढील माहिती ऐकू या, पुढील भागात.
जय जय रघुवीर समर्थ.
पद्माकर देशपांडे
(निरूपणकार पत्रकार / लेखक)
मोबा. 9420695127