दशक तिसरे समास दुसरा स्वगुण परीक्षा
या सगळ्यातून माणूस बाहेर पडला. त्याला मारून मुटकून शहाणं केलं. बऱ्यापैकी आपलं नाव राख्ण्यासारखा मोठा झाला. माय बापाने मग त्याचा विवाह ठरविला. आपलं वैभव दाखवून नवरी पहिली. वराडी आले, वैभव पाहिले, ते पाहून त्याला सुख वाटायला लागते. त्याचं मन मग सासुरवाडीकडे रंगू लागले. आपल्या घरी आई-वडीलांसमोर कसेही असले तरी चालेल. सासुरवाडीला मात्र नेटके जावे. जाताना आपल्याकडे पैसे नसतील तर चढत्या व्याजाने कर्ज काढून घ्यावे. सासरवाडीच्या प्रेमामुळे मायबापाकडे त्याचे लक्ष राहत नाही आणि त्यांची सेवा करावी असं त्याला वाटतं नाही.
नवरी घरामध्ये आल्यावर सासुरवाडीला देखील त्याचा हव्यास वाटायला लागतो आणि मग याला देखील आपल्यासारखं दुसरं कोणीच नाही असा गर्व वाटायला लागतो. नवरीपुढे आई –भाऊ-वडील अप्रिय वाटू लागतात. अशा तऱ्हेने स्त्रीमुळे माणूस संसारामध्ये भुलला. प्रेमामुळे मर्यादा ओलांडतो प्रीती आणि कामासाठी आतुर होतो. पत्नीसाठी त्याचा जीव उतावळा होतो. अशा तऱ्हेने प्रेमपात्र त्याचे सगळे चैतन्यही हिरावून नेते. पत्नीचे कोवळे मंजुळ शब्द ऐकून, तिचे मुखकमल पाहून तो मर्यादा लाज लज्जा विसरतो. तिचा कळवळा येत स्वतःला सावरता येत नाही. तिच्या प्रेमामुळे तो वेडा होतो अन्य व्यवसायात देखील त्याचं मन लागत नाही. बाहेर व्यवसाय करीत असेल तरी घरी मन लागत. क्षणोक्षणी बायकोची आठवण होते. तुझ्या माझ्यातील प्रेम त्यामुळे सर्व चित्त ती हिरावून घेते.
ज्याप्रमाणे ठक आणि पेंढारी ओळख दाखवून रूमालाने फास घालून प्राण घेतात, तसा प्रकार बायकोच्या प्रेमामुळे होतो. बायकोची इतकी प्रीती वाटते की तिला कोणी रागे भरले तरी खुप काळजी वाटते. बायकोचा कैवार घेऊन आईवडिलांची भांडण करतो, त्यांचा तिरस्कार करून वेगळा निघतो. स्त्रीसाठी लाज सोडतो. घरच्यांना सोडतो. स्त्री साठी सर्व जीवलगाना सोडून देतो. स्त्रीसाठी देह विकतो, स्त्रीचा सेवक होतो. तिच्यासाठी सगळा विवेक सारासार विचार सोडून देतो. तिच्या पुढे लोटांगण घालतो, तिच्यापुढे अति नम्रता धरतो. तिच्यासाठी पराधीन होतो. तिचा लोभ धरतो. तिच्यासाठी धर्म सोडतो. तिच्यासाठी तीर्थयात्रा, स्वधर्म सगळ सोडून देतो. तिच्यासाठी शुभाशुभ विचार करीत नाही. सर्वस्व तिला अर्पण करतो. स्त्रीसाठी परमार्थ बुडवतो. स्त्रीमुळे प्राणी स्वहितास मुकतो. ईश्वरास मुकतो. कामबुद्धीने पछाडला जातो. तिच्यासाठी तो भक्ती सोडतो. तिच्यासाठी विरक्ती सोडतो. तिच्यापुढे सायुज्यमुक्ती देखील तुच्छ मानतो. त्या स्त्रीच्या गुणांपुढे त्याला ब्रम्हांड ठेंगणे वाटते. त्याला जिवलग लोकदेखील दुष्ट वाटायला लागतात. अशी प्रीती त्याला जडते आणि तो आयुष्य त्याच्यामध्ये उधळतो.
एखाद्या वेळेस आकस्मात पत्नी मरण पावली तर त्याला शोक होतो. तो म्हणतो माझा घात झाला. माझा संसार बुडाला. मी तिच्यासाठी सगळं त्यात केला जिवलगांना सोडलं सोडलं आता काय करू? असं म्हणून तो दुःखी होतो. लोकांसमोर त्या स्त्रीचे प्रेत घेऊन उर बडवतो, पोट बडवतो. लोकांसमोर लाज सोडतो आणि तिचे गुणगान गातो. माझं घर उडालं आता संसार नको, संसार करीत नाही असे म्हणून दुःखाने तो आक्रंदन करायला लागतो. ओरडायला लागतो. तो भ्रमिष्ट होतो. त्याला सर्वांचा उबग येतो. त्या दुःखामुळे त्या जोगी किंवा महात्मा व्हावेसे वाटते. पण ते तात्पुरते असते .नंतर ते विसरून पुन्हा एकदा लग्न करतो. पुन्हा संसारात मग्न होतो. पुन्हा तेच चक्र. चांगलाच आनंदीआनंद होतो आता पुढे काय होतं त्याचं वर्णन पुढील समासामध्ये करतो. श्रोत्यांनी सावध होऊन ऐकावे.
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सगुण परीक्षा नाम समास द्वितीय समाप्त.
– पद्माकर देशपांडे
(निरूपणकार पत्रकार / लेखक)
मोबा. 9420695127