(कुडाळ)
कुडाळ नगरपंचायत येथे नियोजित विकसित भारत संकल्प यात्रेला सत्ताधारी महाविकास आघाडी गटाच्या नगरसेवक व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी यात्रेतील गाडीवर असलेल्या ‘मोदी सरकार’ या शब्दाला आक्षेप घेत तीव्र विरोध केला. याला तोडीस तोड प्रत्युत्तर देत विरोधी भाजपच्या नगरसेवक, पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोदी सरकार समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी दोन्ही गटांत झटापट झाली. दोन्ही गटांना काबूत आणताना पोलिस व दंगल नियंत्रक पथक पुरते हतबल झाले. या गोंधळातच भाजप गटाकडून यात्रेचे उद्घाटन करून विकसित संकल्प यात्रेच्या गाडीत बसविलेल्या स्क्रीनवरील योजनांची माहिती देण्यात आली.
तब्बल एक तासाहून अधिक वेळ दोन्ही गटांकडून हा गोंधळ सुरूच होता. अखेर गोंधळातच भाजप नगरसेवक व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना बोलावून घेत उपक्रमाची माहिती नागरिकांना सांगण्यास भाग पाडले. त्यानंतर हात पुढे करत शपथ घेतली. मात्र, सत्ताधारी गटाकडून या उपक्रमाचा निषेध करण्यात आला. जिल्ह्यात गेले काही दिवस विकसित संकल्प यात्रा सुरू आहे. या यात्रेत भारत सरकारच्या माध्यमातून विविध योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम केले जात आहे. ही नियोजित यात्रा शुक्रवारी कुडाळ नगरपंचात प्रांगणात आली. या यात्रेतील मोदी सरकार या शब्दाला सत्ताधारी गटातील मंडळींनी आधीच आक्षेप घेत विरोध केला होता.