(नवी दिल्ली)
इंडियन प्रीमियर लीगच्या अंतिम सामन्यानंतर चेन्नई सुपर किंग्जचा स्टार फलंदाज अंबाती रायडूने आपल्या कारकिर्दीला पूर्णविराम दिला. अंतिम फेरीत गुजरातविरुद्ध रायुडूची खेळी सीएसकेसाठी लहान असली तरी सामन्याचा रोख बदलणारी होती. रायुडूने अंतिम सामन्यापूर्वीच ट्विट करत सांगितले होते की, आयपीएल 2023चा अंतिम सामना हा त्याचा शेवटचा आयपीएल सामना असेल.
रायुडूच्या निवृत्तीनंतर 2019 च्या विश्वचषकादरम्यान टीम इंडियामध्ये त्याच्यासोबत काय घडले याची चर्चा अधिक तीव्र चर्चा पुन्हा सुरु झाली आहे. रायुडूबद्दल टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक आणि कर्णधार अनिल कुंबळे म्हणाले की विश्वचषक 2019 मध्ये त्याची निवड न होणे ही मोठी चूक होती. कुंबळेंच्या या वक्तव्यानंतर विराट कोहली आणि रवी शास्त्रीही चर्चेत आले आहेत. 2019 च्या विश्वचषकात टीम इंडिया कोहलीच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरली होती. मात्र न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात संघाला पराभवाचा सामना करावा लागला. वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची निवड होत असताना अंबाती रायडूचे नाव निश्चित केले जात होते.
मात्र त्याच्या जागी विजय शंकरचा समावेश करण्यात आला होता. या घटनेनंतर रायडू खूप निराश झाला आणि त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. रायडूला आधी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी तयार करण्यात आले होते. नंतर त्याची संघात निवड झाली नाही, हे पाहून आश्चर्य वाटल्याचे कुंबळेंनी सांगितले. त्या विश्वचषकादरम्यान भारतामध्ये चौथ्या क्रमांकाच्या स्थानावरून जोरदार भांडण झाले होते.