(बीजिंग)
चीनमधून वार्तांकन करणाऱ्या भारतीय पत्रकाराना महिना अखेरीस देश सोडून जाण्यास सांगण्यात आले आहे. यावर्षी चीनमध्ये भारताचे एकूण ४ पत्रकार होते. एप्रिलमध्ये त्यापैकी दोन पत्रकारांचे व्हिसा आधीच गोठवण्यात आले आणि त्यांना चीनमध्ये प्रवेशबंदी करण्यात आली आहे. गेल्या आठवडण्यात अन्य एका पत्रकाराने बीजिंग सोडले. आता तिथे उरलेल्या एकमेव पत्रकाराच्या व्हिसाची मुदत संपत असून ती वाढवून देण्यास चीनने नकार दिला. त्यामुळे त्यालाही चीन सोडावे लागणार आहे. सीमेवर सुरु असलेल्या तणावादरम्यान, चीनच्या या कारवाईमुळे दोन्ही देशांतील मीडियाची उपस्थिती संपुष्टात आली आहे.
चीनच्या पत्रकारांना भारतामध्ये योग्य सहकार्य मिळत नाही, असा आरोप चीनने केला होता. मात्र, परराष्ट्र मंत्रालयाने हा आरोप फेटाळून लावला. चीनच्या पत्रकारांसह सर्व परदेशी पत्रकारांना भारतात कोणत्याही अडथळे किंवा मर्यादांविना वार्ताकन करता येते. उलट चीनमध्ये स्थानिक लोकांनाही पत्रकार म्हणून नेमण्याची परवानगी मिळत नाही, असे परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी नमूद केले.
भारतीय माध्यमांचे चार पत्रकार चीनमधून वार्तांकन करत होते. त्यापैकी एक पत्रकार हिंदुस्तान टाइम्सचा, दोन प्रसार भारतीचे आणि एक द हिंदू वृत्तपत्राचा होता मात्र, चीनचे परराष्ट्र मंत्रालय आणि भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने यावर भाष्य केलेले नाही. 2020 मध्ये, पूर्व लडाखमध्ये हिंसक संघर्षानंतर भारत-चीन संबंध बिघडले. तेव्हापासून दोन्ही देश अनेक आघाड्यांवर आमनेसामने आहेत.